Nirmala Sitharaman | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय 5G सेवेबाबत मोठे विधान केले आहे. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ अॅडव्हान्स्ड इंटरनॅशनल स्टडीजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, भारताने स्वदेशी 5G पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत आणि आम्ही इतर देशांसोबतही ते तंत्रज्ञान शेअर करण्यास तयार आहोत.
भारताच्या 5G तंत्रज्ञानाचे कौतुक करताना निर्मला सीतारामन म्हणाल्या, "भारतातील 5G तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी आहे. हे इतर कोठूनही आयात (Imported) केलेले नाही आणि ते देशाचे स्वतःचे उत्पादन आहे. ही बाब अजून लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. आम्ही आमच्या देशात लाँच केलेला 5G पूर्णपणे स्वदेशी, स्वतंत्र आहे. त्याचा प्रसार खूप वेगाने होतो. २०२४ च्या अखेरीस देशातील बहुतांश लोक या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकतील. भारताच्या या कामगिरीचा आम्हाला खूप अभिमान आहे. भारतातील साडेसात लाख पंचायतींपैकी ८० टक्के ठिकाणी ऑप्टिकल फायबर पोहोचले आहे. तंत्रज्ञानाच्या वापराने भारतात शासनव्यवस्थेत सुधारणा होत असून अर्थव्यवस्थेच्या डिजिटायझेशनच्या वाढत्या क्षमतेमुळे हे परिवर्तन घडणे शक्य झाले आहे."
"भारत सरकारने सार्वजनिक हितासाठी तयार केलेले ओपन-सोर्स नेटवर्क लहान आणि मध्यम उद्योगांना त्यांचा अवाका वाढविण्यात मदत करत आहे. मला पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की भारतातील हे तंत्रज्ञान ज्या देशांना गरज आहे, त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. 'मुद्रा' योजनेंतर्गत देण्यात आलेल्या सर्व कर्जांपैकी ४५ टक्के कर्ज महिलांना देण्यात आले आहे. असे बरेच वेळा घडले की भारताने जगातील इतर बेंचमार्ककडे पाहिले. पण आता डिजिटल आघाडीवर, पेमेंट, आरोग्य, शिक्षण यावर भारताने खरोखरच नवा बेंचमार्क सेट केला आहे,” असे अभिमानाने त्यांनी सांगितले.