बिरकूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो रेशन दुकानात नसल्यावरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) चांगल्याच भडकल्याचे सांगितले जात आहे. निर्मला सीतारामन या तेलंगण दौऱ्यावर होत्या. भाजपाच्या ‘लोकसभा प्रवास योजने’च्या अंतर्गत सीतारमण यांनी कामारेड्डी जिल्ह्यातील बिरकुर येथे भेट दिली. यावेळी तेथील एका रेशन दुकानात जात नागरिकांशी चर्चा केली. तेव्हा सीतारमण यांना त्या रेशन दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नसल्याचे निदर्शनास आले. त्यावरुन त्या चांगल्याच संतापल्या आणि अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
बाजारात एका किलो तांदळाची किंमत ३५ रुपये आहे. तो तुम्हाला १ रुपयांना दिला जातो. केंद्र सरकार ३० रूपये खर्च उचलते, तर राज्य सरकार फक्त ४ रूपये खर्च देते. करोना महामारी सुरू झाल्यापासून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत पाच किलो तांदूळ मोफत दिला जात आहे. मात्र, तेलंगणातील सरकार रेशन दुकानांमध्ये पंतप्रधान मोदींचे फोटो लावत नाही. पंतप्रधानांचे बॅनर लावले जातात, तेव्हा ते फाडण्यात येतात. पंतप्रधानांचा फोटो रेशन दुकानात का नाही, असा सवाल करत अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले.
अर्ध्या तासात पंतप्रधानांचा फोटो लावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेशन दुकानांतून फोटो का गायब आहे, असा सवाल सीतारमण यांनी जिल्हाधिकारी आणि नागरी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना केला. पण, एकाही अधिकाऱ्याला यासंदर्भात उत्तर देता आले नाही. पंतप्रधानांचा फोटो का नाही ते शोधा. तसेच, अर्ध्या तासात पंतप्रधानांचा फोटो दुकानात लावा, असे आदेशही यावेळी सीतारमण यांनी अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान, अर्थमंत्र्यांनी रेशन दुकानांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यास सांगणे अयोग्य आहे. अर्थमंत्री जे काही बोलत आहे ते पंतप्रधानांचा दर्जा खालावणारे आहे. हे हास्यास्पद आहे. मात्र, त्या नागरिकांना अशा पद्धतीने सांगत आहेत की सर्व तांदूळ केंद्र सरकार मोफत पुरवते, असे प्रत्युत्तर तेलंगणाचे आरोग्य मंत्री टी हरीश राव यांनी दिले.