हरीश गुप्ता
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, पालघर, नागपूर आणि औरंगाबाद या कोविड-१९ ग्रस्त जिल्ह्यांच्या प्रशासनाशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संपर्क साधून स्थितीचा आढावा घेतला. राज्यात वाढणाऱ्या कोरोनाबाबत त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली.
सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. या सर्वच जिल्ह्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने जोडण्यात आले होते. एनसीडीचे संचालक डॉ. एस. के. सिंग यांनी महाराष्ट्रातील कोविद-१९ च्या स्थितीचे सादरीकरण केले. जास्त प्रादुर्भाव असलेले जिल्हे, सक्रिय रुग्ण, मृत्यूदर, पुष्टी दर, रुग्ण दुप्पट होण्याचा दर आणि चाचण्यांचे कमी प्रमाण याची माहिती त्यांनी यावेळी दिली. उपलब्ध आरोग्य सेवा आणि अधिक लक्ष देणे गरजेचे असलेले जिल्हे याची माहितीही सिंग यांनी दिली.
डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, राज्यात कन्टेन्मेन्ट झोन तातडीने वाढविण्याची गरज आहे. लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या भागांसाठी नवीन धोरणे आखण्याचीही गरज आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढवितानाच मृत्यूदर कमी करण्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्रात आयसीयू यंत्रणा, व्हेंटीलेटर्स आणि टेस्टिंग लॅब वाढविणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले. सर्व रुग्णाला व्हेंटिलेटर्स मिळायला हवेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना आॅनलाईन ट्रेनिंग देऊन त्यांची गुणवत्ता वाढविण्याची गरज आहे. कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार करणे शक्य व्हावे यासाठी टेस्टिंग लॅब्सनी तातडीने आपले अहवाल द्यायला हवेत, असेही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.राज्यातील नेत्यांशी चर्चाडॉ. हर्षवर्धन यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याशी उच्चस्तरीय बैठक घेतली.कोरोनाग्रस्त जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाºयांनी बैठकीला हजेरी लावली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांचीही यावेळी उपस्थिती होती.