सध्या देशातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 82,000 एवढी आहे. यातच गेल्या 24 तासांत देशभरात 10 हजारांहून अधिक नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. महत्वाचे म्हणजे, गेल्या 33 दिवसांनंतर एका दिवसात एवढे रुग्ण समोर आले आहेत. याच वेळी, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये पॉझिटिव्हिटी रेट वेगाने वाढताना दिसत आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, देशातील 8 जिल्ह्यांमध्ये सकारात्मकता दर 10% पेक्षा जास्त आहे. याच वेळी, 14 जिल्हे असे आहेत जेथे साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 5-10% एवढा आहे. महाराष्ट्रात 9 डिसेंबरला पॉझिटिव्हिटी रेट 0.76% एवढा होता, तो आता 2.3% झाला आहे. याचप्रमाणे, बंगालमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 1.61% होता, तो वाढून 3.1% झाला आहे. तसेच, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट 0.1% होता, तो आता 1% झाला आहे.
देशात 961 रुग्ण ओमायक्रॉन बाधित -आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील 121 देशांमध्ये एका महिन्यात 3,30,000 हून अधिक ओमिक्रॉन बाधित रुग्ण समोर आले आहेत. ओमिक्रॉनमुळे आतापर्यंत 59 जणांचा मृत्यू झाला आहे. भारताबद्दल बोलायचे झाल्यास, येथे आतापर्यंत 961 ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. यांपैकी 320 रुग्ण बरेही झाले आहेत. दिल्लीत ओमिक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. येथे आतापर्यंत 263 प्रकरणे आढळून आली आहेत. पण यांपैकी 57 रुग्ण बरेही झाले आहेत.
अशी आहे राज्यांची स्थिती -आतापर्यंत महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे 252 रुग्ण आढळून आले आहेत. तर गुजरातमध्ये 97, राजस्थानमध्ये 69, केरळमध्ये 65, तेलंगणामध्ये 62, तामिळनाडूमध्ये 45, कर्नाटकमध्ये 34, आंध्रमध्ये 16, हरियाणामध्ये 12, बंगालमध्ये 11, मध्य प्रदेशमध्ये 9, ओडिशामध्ये 4, उत्तराखंड, छत्तीसगडमध्ये 3, जम्मू-काश्मीरमध्ये 3, उत्तर प्रदेशमध्ये 2, गोव्यात 1, हिमाचलमध्ये 1, लडाखमध्ये 1, मणिपूरमध्ये 1 आणि पंजाबमध्ये 1 रुग्ण आढळून आला आहे.
जगभरात एकूण 2.68 कोटी सक्रिय रुग्ण -लव अग्रवाल यांनी म्हटले आहे, की जगभरातील सक्रिय रुग्णांची संख्या 2.68 कोटी एवढी आहे. रोजचे सरासरी रुग्ण 10 लाख एवढे आहेत. 29 डिसेंबरला जगभरात 17 लाख कोरोना बाधितांची नोंद झाली. यांपैकी अमेरिकेत 28.8%, ब्रिटनमध्ये 12.5%, फ्रान्समध्ये 10.1% , स्पेनमध्ये 6.7% रुग्ण आढळून आले आहेत.