नवी दिल्ली – कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना कोविड फॅसिलिटीत दाखल करण्यासाठीच्या राष्ट्रीय धोरणात बदल केला आहे. आता कोविड आरोग्य सुविधेसाठी कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट येणे बंधनकारक नाही. रुग्णांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन सरकारने हे पाऊल उचललं आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे संशयित कोरोना संक्रमित रुग्णांवर तातडीने उपचाराला सुरूवात होणार आहे. आतापर्यंत कोविड सुविधेत दाखल होण्यासाठी केवळ कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट येणे आवश्यक होतं. केंद्र सरकारने खासगी रुग्णालयासह राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश दिले आहेत. या आदेशात म्हटलंय की, ज्या रुग्णांना कोविडचा संशय वाटतो अशांना CCC, DCHC या संशयित वार्डात दाखल करून घ्यावं. कोणत्याही रुग्णांना सेवा देण्यपासून रोखलं जाऊ शकत नाही असं केंद्राने सांगितले.
या सेवांमध्ये ऑक्सिजन अथवा आवश्यक औषधांचाही समावेश आहे. मग भलेही रुग्ण दुसऱ्या शहरातील का असू नये. कोणाकडेही ओळखपत्र नसल्या कारणाने त्याला उपचारासाठी दाखल होण्यापासून नकार दिला जाऊ शकत नाही. हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या आवश्यकतेनुसार त्याला भरती केलं जाऊ शकतं. मात्र ज्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची गरज नाही, विनाकारण बेड अडवून राहिलेत याची खातरजमा करून घ्यावी. याशिवाय रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत संबंधित पॉलिसीनुसार सोडावं. आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या प्रधान सचिवांना ३ दिवसांच्या आत या आदेशाचे पालन आणि परिपत्रक काढण्याची सूचना दिली आहे.
गेल्या २४ तासांत १८ लाखांहून अधिक चाचण्या
ग्रूप ऑफ मिनिस्टर्सच्या (GoM) २५ व्या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन संबोधित करत होते. "देशात सलग तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत ४ लाखांहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. गेल्या २४ तासांत देशात ४,०१,०७८ नवे रुग्ण आढळले आहेत. पण दुसरीकडे सकारात्मक बाब अशी की गेल्या २४ तासांत ३ लाख १८ हजार ६०९ रुग्ण कोरोनावर मात करुन सुखरूप घरी देखील पोहोचले आहेत. आता देशाची एका दिवसाची चाचण्यांची क्षमता २५ लाख इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात १८ लाख ८ हजार ३४४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत", असं डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं. देशात गेल्या २४ तासांत ४ हजार १८७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंतचा एकूण मृत्यूंचा आकडा २ लाख ३८ हजार २७० वर पोहोचला आहे. तर एकूण रुग्णांची संख्या २ कोटी १८ लाख ९२ हजार ६७६ इतकी झाली आहे