लखनौ - लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावरून केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. लखीमपूर-खेरी हिंसाचार प्रकरणामध्ये मुलगा आशिष मिश्रा मोनू याच्यावर हत्येचा प्रयत्न आणि आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या हिंसाचार प्रकरणात मुलगा आशिष मिश्रा हा अडकण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर पत्रकारांनी त्यावरून विचारलेल्या प्रश्नांमुळे अजय मिश्रा टेनी यांचा तोल ढळला असून, टेनी यांनी माध्यमांना शिविगाळ केल्याची घटना समोर आली आहे. माध्यमांवर संताप व्यक्त करताना टेनी यांनी ही शिविगाळ केली.
लखीमपूरमधील ओयल येथे मदर चाइल्ड केअरच्या ऑक्सिजन प्लॅटचे उदघाटन करण्यासाठी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी आले होते. तेव्हा त्यांना मुलगा आशिष मिश्रा याच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ते म्हणाले, की हेच ## जे प्रसारमाध्यमवाले आहेत ना, एका निर्दोष व्यक्तीला त्यांनी फसवले आहे. किती वाईट लोक आहेत हे, यांना लाज वाटत नाही. हॉस्पिटल आहे, सर्व आहे. हे त्यांना दिसत नाही.
आज जेव्हा पत्रकारांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना एसआयटी रिपोर्टबाबत काही प्रश्न विचारले गेले. तेव्हा ते संतापले. ते म्हणाले. जाऊन एसआयटीला विचारा. हे तर तुमचे मीडियावाले आहेत ना. याच ##नी एका निर्दोष व्यक्तीला अडकवले आहे. लाज नाही वाटत. किती वाईट लोक आहेत हे. जाणून घेऊ इच्छिता, एसआयटीला विचारणार नाही का?
जो व्हिडीओ समोर आला आहे, त्यामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी पत्रकारावर हात उगारण्याचाही प्रयत्न केला. मात्र सोबर असलेल्या लोकांनी त्यांना रोखले. त्यानंतर अजय मिश्रा टेनी यांनी पत्रकारांना पुन्हा शिविगाळ केली.
लखीमपूर खेरी हिंसाचारातील मुख्य आरोपी असलेल्या आशिष मिश्रा यांच्यासह सर्व १३ आरोपींच्या अडचणी वाढवल्या आहेत. तपास अधिकाऱ्याच्या अर्जावर कोर्टाने मंगळवारी सर्व आरोपींवर हत्या, सदोष मनुष्यवध आणि बेदरकारपणे वाहन चालवणे, अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला. हे कलम हटवून एक मत होऊन हत्येचा प्रयत्न आणि परवान्याचा दुरुपयोग अशी कलमे लावण्यास मान्यता दिली आहे.