Amit Shah In Bihar: केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी बिहार दौऱ्यावर असताना मोठे विधान केले आहे. बिहारमध्ये लवकरच भाजपचे सरकार येईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीबाबात बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्तेत येण्याबाबत सूचक विधान केले.
२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी बिहारमधील सर्व ४० लोकसभा जागा जिंकेल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुझिव्ह अलायन्स (इंडिया) वर ‘सनातन धर्मा’चा अपमान केल्याबद्दल अमित शाह यांनी टीका केली. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीने संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) हे पूर्वीचे नाव वगळले कारण या आघाडीचे नाव १२ लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्याशी जोडले गेले होते, असा दावा शाह यांनी केला.
PM मोदी पुन्हा सत्तेत आले नाहीत, तर...
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले नाहीत, तर बिहारमधील सीमा भाग घुसखोरांनी भरला जाईल, असा इशारा अमित शाह यांनी दिला. नेपाळ आणि बांगलादेशजवळ असलेल्या झांझारपूर लोकसभा मतदारसंघात एका सभेला संबोधित करताना शाह यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यांच्यावर सरकारी शाळांमधील सुट्ट्या कमी करून, तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप केला.
दरम्यान, बिहारच्या सरकारने रक्षाबंधन, जन्माष्टमीसारख्या सणांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, बिहारवासीयांनी विरोध करून राज्य सरकारला हा आदेश मागे घेण्यास भाग पाडले. त्याबद्दल बिहारच्या जनतेचे अभिनंदन करतो. अयोध्येतील राम मंदिराची उभारणी आणि जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० मागे घेण्याचा निर्णय रद्द करण्याचा प्रयत्न काँग्रेस करीत आहे, असा आरोप त्यांनी केला. बिहारच्या सत्ताधारी आघाडीत काँग्रेस आहे. अनुच्छेद ३७० रद्द करणे आणि अयोध्येत राम मंदिर पुढील वर्षी जानेवारीपर्यंत उभारले जात असल्याबद्दल अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले.