नवी दिल्ली : लोकसभेत वादळी चर्चेनंतर एसपीजी (SPG) संशोधन बिल बुधवारी मंजूर करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एसपीजी संशोधन बिल सादर केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर पलटवार केला.
गांधी कुटुंबियांची एसपीजी सुरक्षा हटविल्यावरुन काँग्रेसने सत्ताधारी भाजपावर सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. यावर पलटवार करताना अमित शाह यांनी सुडाचे राजकारण करणे हे भाजपाच्या संस्कारांध्ये नाही, तर ती काँग्रेसची ओळख असल्याचे सांगत हल्लाबोल केला.
आतापर्यंत एसपीजी सुरक्षेच्या नियमांमध्ये जे बदल झाले होते. ते फक्त एका कुटुंबाला लक्षात घेऊन करण्यात आले होते. मात्र, आता यामध्ये पहिल्यांदा पंतप्रधानांची सुरक्षा पाहून बदल करण्यात येत आहे. एसपीजी पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी आहे. याचा प्रतिष्ठेचं प्रतिक (status symbol) म्हणून वापर होणार नाही, असे सांगत अमित शाह यांनी गांधी कुटुंबियांचे नाव न घेता टोला लगावला. याचबरोबर, आता फक्त जे पंतप्रधान असतील त्यांनाच ही सुरक्षा मिळेल. शिवाय माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाला फक्त ५ वर्ष ही सुरक्षा दिली जाईल, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, केंद्र सरकारकडून SPG नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. ज्यामुळे गांधी परिवाराला दिलेली एसपीजी सुरक्षा काढून घेण्यात आली होती. यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी यावरुन सरकारवर जोरदार टीका केली होती. काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी सांगितले की, आज आपण या संवेदनशील बिलावर बोलत आहोत. जी पंतप्रधानांच्या सुरक्षेशी संबधित आहे. इतिहासात पाहिले तर जेव्हा जेव्हा असे नकारात्मक निर्णय घेतले गेले. तेव्हा तेव्हा देशाला याचे नुकसान झाले आहे.