Amit Shah Reaction On Union Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावरून आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर टीका करण्यात येत असून, एनडीएतील पक्षांकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात येत आहे. बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी मोठ्या निधीची तसेच विविध योजनांची घोषणा करण्यात आली असून, यावरून इंडिया आघाडीने निशाणा साधला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले असून, देशवासीयांच्या विश्वासपूर्तीचा अर्थसंकल्प असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
अमित शाह यांनी एक्सवर एक पोस्ट करत केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली. केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारच्या देशवासीयांच्या आशा, आकांक्षा आणि विश्वासपूर्तीच्या संकल्पाचे प्रतिबिंब दिसून येत आहे. हा अर्थसंकल्प तरुण, महिला सशक्तीकरण यासह शेतकरी वर्गासाठी अनेक संधी निर्माण करणारा तसेच विकसित आणि आत्मनिर्भर भारत निर्माणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून भावी पीढीचे आत्मबल वाढवण्यासाठी तसेच मजबुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना शुभेच्छा देतो, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.
या गोष्टी झाल्या स्वस्त
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये मोठ्या घोषणा केल्याने कॅन्सरवरील औषधे स्वस्त झाली आहेत. मोबाईल चार्जरसह अन्य उपकरणावर कर १५ टक्के घट केला आहे. त्याशिवाय सोने, चांदी यांच्यावरील कस्टम ड्युटी कमी करून ती ६ टक्के केली आहे. त्यामुळे सोने चांदी यांच्या किंमतीत घट होणार आहे. त्याशिवाय सरकारने चामड्याच्या वस्तू आणि फुटवेअरवरील कस्टम ड्युटीत घट केली आहे. तसेच सरकारने पोलाद आणि तांब्यावरील मूळ कस्टम ड्युटी कमी केली आहे.
दरम्यान, देशात तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना मोदी सरकारने रिटर्न गिफ्ट दिले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी मोठ्या निधीची घोषणा केली आहे. बिहारमध्ये मोठे मेडिकल कॉलेज, नवीन विमानतळ, वैद्यकीय सुविधा आणि क्रीडा पायाभूत सुविधांची घोषणा केली.