नवी दिल्ली: केंद्र सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाविरोधात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी मणिपूर हिंसाचारवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपर्यंत मणिपूरला गेले नाही. वास्तव म्हणजे आता मणिपूर उरलाच नाहीय. मणिपूरमधील परिस्थिती अतिशय भयानक आहे. मोदींनी मणिपूरचे विभाजन केले. मोदी सरकारने मणिपूरची हत्या केली, असा घणाघात राहुल गांधी यांनी यावेळी केला.
काँग्रेसने आणणेल्या अविश्वास प्रस्तावावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. अविश्वास प्रस्तावाची तीन उदाहरणे आहेत. दोन युपीए सरकारच्या विरोधात तर एक एनडीए विरुद्ध. १९९३मध्ये नरसिंह सरकार होते. त्याच्या विरोधात प्रस्ताव आला होता. त्यांनी अविश्वास ठराव जिंकला. २००८मध्ये मनमोहन सरकार विश्वासदर्शक ठराव घेऊन आले. त्यांच्याकडे बहुमत नाही असे वातावरण होते. पण खासदारांना कोट्यवधी रुपयांची लाच देण्यात आली आणि सरकार वाचले. १९९९मध्ये अटल सरकार होते. अविश्वास प्रस्ताव आला. काँग्रेसने जे केले ते भाजपाही करू शकली असती, पण अटलजींनी आपले म्हणणे मांडले आणि संसदेचा निर्णय मान्य केला, असं अमित शाह यांनी सांगितले.
अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर देखईल निशाणा साधला. ते म्हणाले की, या सभागृहात एक असा नेता आहे ज्याला १३ वेळा राजकारणात लॉन्च केले गेले. मात्र प्रत्येक वेळी ते अयशस्वी झाले. तो नेता एका गरीब आई कलावती (बुंदेलखंड, महोबा) च्या घरी जेवणासाठी गेला. संसदेत त्यांनी आई कलावती यांच्या गरिब परिस्थितीचे वर्णन केले. त्यानंतर सहा वर्षे काँग्रेसचे सरकार होते. पण त्या कलावतीसाठी काहीच केले नाही. त्या कलावतीला घर, वीज, गॅस, धान्य, शौचालय, आरोग्य देण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले. ज्या कलावतींच्या घरी तुम्ही जेवायला गेलात, तिचाही मोदींवर अविश्वास नाही, अशी टीका अमित शाह यांनी केली.
दरम्यान, काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला. पण गरिबी तशीच राहिली. पण मोदींनी गरिबी पाहिली होती, त्यामुळे त्यांना लोकांच्या समस्या समजल्या. पंतप्रधान मोदींनी ९ वर्षांत ११ कोटींहून अधिक कुटुंबांना शौचालये दिली. लोक क्लोराईडयुक्त पाणी पितात. मोदींनी हर घर जल योजनेतून १२ कोटींहून अधिक लोकांच्या घरात पाणी आणले. काँग्रेस कर्जमाफीसाठी लॉलीपॉप देत असे, तर शेतकऱ्याला कर्जमाफी हा भाजपचा अजेंडा आहे. काँग्रेसने नुसत्या घोषणा केल्या, पण भाजपाने अंमलबजावणी केली, असे अमित शाह म्हणाले.