भाजपाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनात गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांची इंडिया आघाडी म्हणजे ७ घराणेशाही पक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांच्या पक्षात लोकशाही नाही, तर देशात लोकशाही कशी राहणार?, असा सवालही अमित शाह यांनी उपस्थित केला.
इंडिया आघाडीवर टीका करताना अमित शाह म्हणाले की, त्यात सहभागी असलेले सर्व पक्ष घोटाळ्यांमध्ये सामील झालेले आहेत. आम आदमी पक्षानेही दिल्लीत अनेक घोटाळे केले. पांडव आणि कौरवांप्रमाणेच लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन छावण्या निर्माण झाल्या आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली पहिला कॅम्प म्हणजे एनडीए आघाडी, राष्ट्र प्रथम हा आपल्या आघाडीचा उद्देश आहे. पुढील निवडणूक विकासाची आघाडी विरुद्ध घराणेशाही आघाडी यांच्यात होणार आहे, असं अमित शाह म्हणाले.
खासदार सोनिया गांधींचे लक्ष्य राहुल गांधींना पंतप्रधान बनवणे, शरद पवारांचे लक्ष्य आपल्या मुलीला मुख्यमंत्री बनवणे, उद्धव ठाकरेंचे लक्ष्य आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवणे, लालू यादव यांचे लक्ष्य आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवणे, मुलायम सिंह यांचे उद्दिष्ट मुलाला मुख्यमंत्री बनवणे, हे आहे, असं टीका अमित शाह यांनी केले. भाजपा जर कुटुंबाभिमुख पक्ष असता तर चहा विकणाऱ्याचा मुलगा कधीच पंतप्रधान झाला नसता. लोकशाहीत सर्वांना समान संधी मिळणे महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, पुत्रांचे कल्याण हेच ध्येय असेल तर देशाचे कल्याण कसे होणार? देशातील तरुणांना विरोधी पक्षांमध्ये पुढे जाऊ दिले जात नाही, असा निशाणा अमित शाह यांनी साधला.
या देशात 2G, 3G आणि 4G पक्ष-
अमित शाह म्हणाले, "या देशात 2G, 3G आणि 4G पक्ष आहेत. 2G म्हणजे घोटाळा नाही. 2G म्हणजे २ पिढीचा पक्ष... त्यांचा नेता ४ पिढ्यांपर्यंत बदलत नाही... कोणी पुढे सरकले तर याचा त्रास त्यांना होतो. ते भाग्य, असे नशीब भोगलेले अनेक लोक आज भाजपामध्ये सामील होत आहेत आणि लोकशाहीच्या प्रवासात सामील होत आहेत.