Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्न दिवसेंदिवस शिगेला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरून लोकसभेतही खडाजंगी झाली. राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशानावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेण्याचा मानस बोलून दाखवल होता. मात्र, अमित शाहांशी भेट होऊ शकली नाही.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी शिंदे-भाजप सरकार गांभीर्याने ठोस पावले उचलत नसल्याची टीका करत महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. लोकसभेतही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. या प्रकरणी अमित शाह यांची भेट घेण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र, ती भेट होऊ शकली नाही.
महाविकास आघाडीने आपली भूमिका केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवली
अमित शाहांशी भेट होऊ न शकल्याबाबत प्रतिक्रिया देताना, गृहमंत्र्यांनी आम्हाला वेळ दिली होती. मात्र ते भेटले नाहीत. कदाचित मिंधे गटाला आधी भेटायचे असावे किंवा गुजरात निकाल महत्त्वाचा असावा, असा टोला ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लगावला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई उघड धमकी देतात. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाने जर हिंसक वळण घेतले तर? कर्नाटकात महाराष्ट्र पासिंगच्या गाड्या अडवल्या जात आहेत. याला इथे प्रतिक्रिया इथे मिळाली तर ? यासाठी केंद्र सरकार जबाबदार असेल, असे पत्राद्वारे सूचित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सीमा प्रश्न बाबत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सीमा भागातील ८६५ गावांमध्ये मराठी लोकांचे वास्तव्य आहे. या मराठी लोकांचे संरक्षण करण्याची गरज आहे. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या भागात कायदा सुव्यवस्था राखणे गरजेचे आहे. शांततेत निदर्शनं करणाऱ्या मराठी जनतेवर सीमा भागात अत्याचार करण्यात येतोय, असा दावा महाविकास आघाडीने या पत्रातून केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"