नवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्री दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीरच्या दौ-यावर आहेत. राजनाथ सिंह अधिका-यांबरोबरच दहशतवादविरोधी कारवाईची समीक्षा करणार आहेत. परंतु त्यांच्या जम्मू-काश्मीरच्या दौ-यादरम्यान दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला आहे. सुरक्षा जवान गस्तीवर असतानाच हा हल्ला झाला असून, यात दोन जवान जखमी झालेत.उत्तर काश्मीरमधल्या कुपवाड्यातल्या केरन सेक्टरमध्ये एलओसीजवळ हा हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार केला आहे. सुरक्षा जवानांनी प्रत्युत्तरादाखल दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. भारतीय लष्कराच्या सुरक्षा जवानांनी परिसरात सर्च ऑपरेशन राबवलं आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात काही जवान जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दहशतवाद्यांची संख्या 5 असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.राजनाथ सिंह जम्मू-काश्मीरच्या दौ-यावर असताना अधिका-याबरोबरत दहशतवाद्यांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. तसेच कुपवाडा, श्रीनगर आणि जम्मू काश्मीरसारख्या मोजक्या ठिकाणांचाही ते दौरा करणार आहेत. तसेच मुख्यमंत्री महबूबा मुफ्तींच्या इफ्तार पार्टीतही ते सहभागी होणार आहेत. राजनाथ सिंह उद्या दिल्लीला परतणार आहेत. सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांचा ठिकाणांचा पर्दाफाश केला असून, शस्त्रास्त्रंही जप्त केली आहेत.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह जम्मू-काश्मीरच्या दौ-यावर असताना दहशतवादी हल्ला, दोन जवान जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2018 1:51 PM