“राहुल गांधींनी अन् काँग्रेस पक्षाने माफी मागावी”; ‘त्या’ विधानावरून किरेन रिजिजू आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 01:13 PM2023-08-09T13:13:44+5:302023-08-09T13:18:12+5:30
Parliament No-confidence Motion Debate: ईशान्य भारताच्या परिस्थितीला सर्वस्वी काँग्रेस जबाबदार असल्याची टीका किरेन रिजिजू यांनी केली.
Parliament No-confidence Motion Debate: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणला आहे. विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर दुसऱ्या दिवशी चर्चा केली जात आहे. खासदारकी पुन्हा बहाल केल्यानंतर लोकसभेत येत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. मणिपूर हिंसाचारावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार शब्दांत हल्लाबोल केला. यावर केंद्रीय मंत्री यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने माफी मागावी, अशी आग्रही मागणी केली.
काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो होतो. आमचे पंतप्रधान गेले नाहीत, आजही गेले नाहीत, कारण त्यांच्यासाठी मणिपूर हा भारत नाही. मी 'मणिपूर' हा शब्द वापरला, पण सत्य हे आहे की, मणिपूर आता राहिले नाही. तुम्ही मणिपूरचे दोन तुकडे केले आहेत. तुम्ही मणिपूरचे विभाजन करून तोडले आहे. मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या तुम्ही केली, तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही भारत मातेची हत्या केली आहे. तुम्ही देशभक्त नाहीत. तुम्हाला देशाबद्दल प्रेम नाही, असे सांगत राहुल गांधी यांनी तीव्र शब्दांत टीकास्त्र सोडले. यावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आक्षेप घेत राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी केली.
राहुल गांधींनी अन् काँग्रेस पक्षाने माफी मागावी
राहुल गांधींच्या विधानानंतर किरेन रिजिजू उभे राहिले. तुम्ही हे नक्की काय बोलताय. राहुल गांधी यांनी सभागृहात जी भाषा वापरली आहे, जी विधाने केली आहेत, त्यावर राहुल गांधी यांना प्रश्न विचारायचा आहे, गेल्या अनेक वर्षांपासून ईशान्य भारत धुमसतोय, अनेक हत्या होत आहेत, याला जबाबदार काँग्रेस पक्ष आहे. राहुल गांधी यांनी या विधानाबाबत माफी मागितली पाहिजे. ६० वर्षांहून अधिक काळ काँग्रेसने देशावर राज्य केले आहे. ईशान्य भारताची आताची परिस्थिती जी आहे, त्याला सर्वस्वी काँग्रेस जबाबदार आहे. ईशान्य भारतात जेवढ्या दहशतवादी संघटना, नक्षलवादी संघटना कार्यरत आहेत, त्याला काँग्रेस जबाबदार आहे, असा पलटवार किरेन रिजिजू यांनी केला.
दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेल्या विधानानंतर लोकसभेत एकच गदारोळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. लोकसभा अध्यक्ष यांनी सदस्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. सदस्यांची वागणूक योग्य नसल्याचे सांगितले. तरीही लोकसभेतील सदस्य आक्रमक होत होते. राहुल गांधी आपले भाषण संपल्यानंतर लोकसभेतून निघून गेल्याचे सांगितले जात आहे.