Sanatana, Udhayanidhi vs BJP : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत एक वक्तव्य केले. सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी करत, हा धर्म समूळ नष्ट केला पाहिजे, असे ते म्हणाले. या मुद्द्यावरून भाजपा नेते आक्रमक झाले. एका जाहीर सभेत केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सनातन धर्माविरोधात बोलणाऱ्यांना ताकीद दिली. यावेळी बोलताना त्यांनी सनातन धर्माविरोधात बोलणाऱ्यांविरोधात आक्रमक विधान केले.
"सनातनच्या विरोधात जो कोणी काहीही बोलेल त्या प्रत्येक शब्द बोलणाऱ्याची जीभ आम्ही खेचून बाहेर काढू. जो सनातनकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचे आम्ही डोळे बाहेर काढू, सनातनच्या विरोधात बोलणारा एकही व्यक्ती या देशात आपली राजकीय ताकद कायम ठेवू शकत नाही. या देशावर अनेक संकटे आली; भारताचे वैभव, संपत्ती लुटण्यासाठी अनेक हल्ले झाले; अनेकांनी या देशाची संस्कृती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. सनातन धर्म नष्ट करण्यासाठी आपल्यावर २००० वर्षे सतत आक्रमणे झाली. पण आपले पूर्वज सक्षम होते, त्यांनी आपल्या स्वत:च्या बळावर भारताच्या संस्कृतीची आणि सनातन धर्माची रक्षा केली. आज पुन्हा काही लोक सनातन धर्म संपवण्याची भाषा करतात. आपण शपथ घेऊन सांगितलं पाहिजे की सनातन धर्माविरोधात बोलणाऱ्यांचा आपण तीव्र विरोध केला पाहिजे. जे लोक सनातन धर्म संपवण्याबद्दल बोलतील त्यांची आम्ही जीभ हासडून हात देऊ," असे अतिशय आक्रमक मत त्यांनी व्यक्त केले.
उदयनिधी काय म्हणाले होते?
उदयनिधी यांनी सनातन निर्मूलन परिषदेत म्हटले होते, "सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करण्यापेक्षा त्या रद्दबातल केल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. सनातन धर्माला नुसता विरोध करू नये, त्यापेक्षा तो मूळापासून नष्ट करायला हवा. सनातन हे संस्कृत नाव आहे. हे सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे."