Manipur Voilence : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी नवी दिल्लीत मणिपूरमधील परिस्थितीबाबत भाष्य केलं. मणिपूरमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार मेईतेई आणि कुकी या दोन्ही समुदायांशी चर्चा करत आहे आणि घुसखोरी थांबवण्यासाठी म्यानमारशी संपर्क साधला असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेदरम्यान, एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे संतापल्याचे पाहायला मिळाले. मणिपूरवर पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर अमित शाह यांनी पत्रकाराला तुम्ही प्रश्न विचारू शकता, वाद घालू नका, असा सल्ला दिला.
तिसऱ्या मोदी सरकारचे १०० दिवस पूर् झाल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी मणिपूरमधल्या परिस्थितीबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यावेळी अमित शाह यांनी मणिपूर हिंसाचारावर मौन बाळगून तिथल्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर काहीही भाष्य न करणे पसंत केले. केंद्र सरकार राज्यात शांततेसाठी बोलत आहे, असं अमित शाह म्हणाले. तसेच वन नेशन वन इलेक्शन, वक्फ विधेयक आणि शेतकरी योजनांसह सरकारच्या अनेक कामांवर त्यांनी प्रकाश टाकला. मात्र पत्रकाराने मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या राजीनाम्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी कोणतेही थेट उत्तर दिले नाही.
पत्रकार परिषदेदरम्यान, एका पत्रकाराने अमित शहा यांना मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला असता केंद्रीय गृहमंत्र्यांनी थेट उत्तर दिले नाही. उलट ते म्हणाले की तुम्ही प्रश्न विचारू शकता, पण वाद घालू नका. यावेळी पत्रकाराने पंतप्रधान मोदी मणिपूरला कधी जाणार असेही विचारलं. त्यावर अमित शाह यांनी तुम्हाला माहिती दिली जाईल, असं म्हटलं.
"मणिपूरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोणतीही मोठी हिंसक घटना घडलेली नाही आणि लवकरच परिस्थिती सामान्य होईल अशी आशा आहे. मणिपूरमधील हिंसाचाराचे मूळ हे जातीय संघर्ष असून तो सोडवण्याचा मार्ग दोन समुदायांमधील संवादातूनच आहे. हा जातीय हिंसाचार असून जोपर्यंत दोन समुदायांमध्ये संवाद होत नाही तोपर्यंत तोडगा निघू शकत नाही. सरकार शांतता राखण्यासाठी दोन्ही समुदायांशी सतत चर्चा करत आहे आणि परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे," असं अमित शाह यांनी म्हटलं.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सांगितले की, मणिपूरमधील हिंसाचाराचे मुख्य कारण म्हणजे म्यानमारमधून होणारी घुसखोरी, ती रोखण्यासाठी सरकारने आवश्यक पावले उचलली आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या १०० दिवसांत म्यानमार आणि भारताच्या सीमेवर कुंपण घालण्याचे कामही सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.