केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आसामच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी अमित शाह यांनी गुवाहाटीमध्ये 44 हजार 703 तरुणांना नियुक्ती पत्र दिले. या कार्यक्रमात अमित शहा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याबद्दल अमित शाह म्हणाले की, सरकारला काही फरक पडत नाही. देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे.
काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून क्षुद्र राजकारण करत आहेत. हा जनतेच्या जनादेशाचा अपमान आहे. देशातील जनता काँग्रेसच्या इच्छेवर अवलंबून नाही. काँग्रेस जेव्हा सर्व काही स्वतः ठरवते, तेव्हा त्यांना ते आवडते, असे अमित शहा म्हणाले. तसेच, मला काँग्रेसला विचारायचे आहे की, छत्तीसगडमध्ये सोनिया गांधींनी विधानसभेचे भूमिपूजन केले, तेव्हा राज्यपालांना का बोलावण्यात आले नाही? असा सवाल अमित शाह यांनी केला.
याचबरोबर,यावेळी अमित शाह यांनी आसामच्या मागील सरकारांवरही निशाणा साधला. ज्या आसाममध्ये पूर्वी कर्फ्यू अनेक महिने लागू होता आणि गोळीबाराच्या घटना घडत होत्या, त्याच आसाममध्ये आता विकासाची चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे विकासाचे नवे पर्व सुरू केले आहे, असे अमित शाह म्हणाले.
दुसरीकडे, नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर विरोधकांनी टाकलेल्या बहिष्काराबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, विरोधक असा निर्णय घेऊन भारताला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधक नकारात्मकता पसरवत आहेत. एक भारत श्रेष्ठ भारत सोबत जोडणारे देशवासी वेळ आल्यावर विरोधकांना नक्कीच प्रत्युत्तर देतील. प्रत्येक भारतीयाला या क्षणाचा अभिमान वाटत आहे.
दरम्यान, नवीन संसद भवनाचे उद्घाटन 28 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाला बहुतांश विरोधी पक्ष विरोध करत आहेत. संसदेच्या नवीन भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हायला हवे, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. काँग्रेससह जवळपास 20 विरोधी पक्षांनी या उद्घाटन समारंभात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे.