नवी दिल्ली: अनंत कुमार यांचं योगदान कायम स्मरणात राहील. ते अतिशय असामान्य नेते होते, अशा शब्दांमध्ये पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्री मंडळातील सहकाऱ्याला श्रद्धांजली वाहिली आहे. संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी आज मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. ते 59 वर्षांचे होते. बंगळुरुमधून ते सहावेळा भाजपाच्या तिकिटावर लोकसभेवर गेले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. मात्र ती अपयशी ठरली.अनंत कुमार यांच्या निधनानं अतिशय दु:ख झाल्याची भावना पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारे व्यक्त केली. 'माझे मित्र आणि सहकारी अनंत कुमार यांच्या निधनानं अतिशय दु:ख झालं आहे. ते अतिशय असामान्य नेते होते. तरुणपणीच ते समाजकारणात सक्रीय झाले. त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील,' अशा शब्दांमध्ये मोदींनी अनंत कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. मोदींनी अनंत कुमार यांच्या पत्नी तेजस्विनी यांच्याशी संवाद साधून त्यांचं सांत्वन केलं. कुमार कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही अनंत कुमार यांना श्रद्धांजली वाहिली.गेल्या काही महिन्यांपासून अनंत कुमार यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. काही दिवसांपूर्वीच ते उपचारांसाठी अमेरिकेलादेखील गेले होते. भाजपाचा दक्षिणेतील चेहरा अशी त्यांची ओळख होती. अतिशय कमी वयात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रीय झाले. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भाजपा असा राजकीय प्रवास त्यांनी केला. कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. 1996 पासून ते दक्षिण बंगळुरु मतरासंघाचं लोकसभेत प्रतिनिधीत्व करत होते. वाजपेयी सरकारमधील सर्वात तरुण मंत्री अशीदेखील त्यांची ओळख होती. विशेष म्हणजे त्यांनी काळाची पावलं खूप आधीच ओळखली होती. स्वत:ची स्वतंत्र वेबसाईट सुरू करणारे ते पहिले मंत्री होते.