नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीविरोधात देशभरात ठिकठिकाणी विरोध प्रदर्शन होत असताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे वादग्रस्त विधान समोर आलं आहे. निवडणुकीच्या रॅलीमध्ये भाषण करताना अनुराग ठाकूर यांनी भडकाऊ भाषण केल्याचा आरोप विरोधकांनी लावला आहे. अनुराग ठाकूर मंचावरुन भाषण करताना देश के गद्दारो को अशी घोषणा देताना लोकांमधून गोली मारो .... को अशा प्रतिघोषणा देण्यात येत होत्या.
अनुराग ठाकूर यांच्या विधानानंतर सोशल मीडियावर हॅशटॅग गद्दार असा ट्रेंड सुरु आहे. याबाबत ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ट्विट करुन अनुराग ठाकूर यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. लोकांना भडकवण्याचे काम करणाऱ्यांना जेलमध्ये असायला हवं त्याऐवजी अनुराग हे मोदी सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.
याबाबत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपावर आरोप करत अनुराग ठाकूर यांच्या विधानाबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यावरुन दिल्ली मुख्य निवडणूक अधिकारी यांनी अनुराग ठाकूर यांच्या कार्यक्रमाचा रिपोर्ट मागवला आहे. काँग्रेसकडून अनुराग ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रिठाला येथील भाजपा उमेदवार मनिष चौधरी यांच्या समर्थनार्थ मंत्री अनुराग ठाकूर यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शाहीनबाग येथे सुरु असलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. यामध्ये देशविरोधी घोषणाबाजी केली जात असल्याचा आरोप भाजपाने केला. तर देशातील शांतता बिघडवण्यासाठी भाजपा नेते काम करतायेत असा आरोप काँग्रेसचे नेते किर्ती आझाद यांनी केला आहे.
अलीकडेच भाजप नेत्याने दिल्लीतील लढत म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत असल्याचे म्हटलं होतं. त्यामुळे इतर राज्यातील निवडणुकांप्रमाणेच दिल्ली विधानसभा निवडणुकीतही पाकिस्तानची एन्ट्री झाली. याआधी 2015 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत देखील पाकिस्तानला अशाचप्रकारे केंद्रस्थानी आणले गेले होते. त्यावेळी अशा प्रकारचे वक्तव्य भाजपकडूनच करण्यात आले होते. त्यावेळी भाजपच्या अध्यक्षपदी अमित शाह होते. बिहारमध्ये आयोजित एका सभेत शाह म्हणाले होते की, बिहारमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानात फटके फुटतील. त्यावेळी निवडणुकीचा निकाल भाजपला अनुकूल लागला नाही. मात्र शाह यांच्या वक्तव्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल कऱण्यात आली होती.