नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका मीडिया समुहाच्या कार्यक्रमामध्ये चॅलेंज मिळाल्यावर अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. थेट स्टेजवर दोरीच्या उड्या मारण्यास सुरुवात केली. केंद्रीय मंत्र्यांच्या दमदार कामगिरीला उपस्थित प्रेक्षकांकडून देखील मोठी दाद देखील मिळाली. जितक्या वेळा ठाकूर यांनी दोरीउड्या मारल्या तितक्या वेळा लोकांनी टाळ्या वाजवल्या. त्याचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे.
अनुराग ठाकूर यांचा दोरीउड्या मारतानाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे. अनुराग ठाकूर यांनी स्वतः देखील आपल्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते चक्क कुर्ता-पायजामामध्ये भर मंचावर विविध प्रकारे दोरीवरच्या उड्या मारताना दिसून आले आहेत. तसेच "खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन होणं आवश्यक आहे" असं देखील ठाकूर यांनी म्हटलं आहे.
अनुराग ठाकूर यांनी एक क्रीडा राष्ट्र म्हणून भारताच्या प्रवासावर देखील भाष्य केलं. "क्रीडा संस्कृती निर्माण करणं हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देणं अत्यंत आवश्यक आहे" असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खेळाच्या आवडीवरही भाष्य केलं. पंतप्रधान मोदींना खेळात प्रचंड रस असून त्यांनी याबाबत सातत्याने पाठिंबा दिल्याचं अनुराग ठाकूर म्हणाले. पंतप्रधान खेळाडूंशी संवाद साधतात आणि त्यांना प्रोत्साहित करतात. हे खूप महत्वाचं आहे हे सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.