केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे (Ashwini Choubey) यांचे धाकटे भाऊ निर्मल यांचे बिहारमधील भागलपूर येथील मायागंज रुग्णालयात निधन झाले. यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत मोठा गोंधळ केला. याप्रकरणी दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले. निर्मल चौबे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले आणि मृतदेह घेऊन घरी गेले.
केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांचे धाकटे बंधू निर्मल चौबे यांचे मायागंज रुग्णालयात निधन झाले. याप्रकरणी आयसीयूमध्ये कर्तव्यावर असलेल्या दोन डॉक्टरांना गैरहजर राहिल्याचा आरोप ठेवून तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. निर्मल यांचा मुलगा नितेश चौबे यांनी सांगितले की, घरी दुपारी चार वाजता वडिलांना छातीत दुखू लागले आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी चौबे यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून त्यांना आयसीयूमध्ये हलवले.
एकही डॉक्टर पोहोचला नाही
नितेशच्या म्हणण्यानुसार, जेव्हा वडिलांना दाखल करण्यात आले तेव्हा तेथे डॉक्टर नव्हते, तर त्यांची प्रकृती सतत खालावत होती. बीपी मशीन म्हणजे काय हे अटेंडंटलाही माहीत नव्हते. यादरम्यान वडिलांची प्रकृती ढासळत राहिली, मात्र उपचारासाठी एकही डॉक्टर पोहोचला नाही. सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या गोंधळादरम्यान डॉ. महेश कुमार आणि डॉ. असीम कुमार दास यांना रोषाला सामोरे जावे लागले. माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि लेखी तक्रार मिळाल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रुग्णालयाच्या अधीक्षकांनी कर्तव्यावर गैरहजर असलेल्या दोन्ही डॉक्टरांना निलंबित केले.
निर्मल चौबे दीड तास तडफडत राहिले, उपचार न मिळाल्याने मृत्यू
कुटुंबीयांचे म्हणणे आहे दीड तास उपचार झाले नाहीत. नातेवाईक आणि युवा मोर्चाच्या नेत्यांनी रुग्णालयात गोंधळ घातला. निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे. रुग्णालयाचे अधीक्षक आयसीयूमध्ये पोहोचले, तेथे नातेवाईकांनी त्यांना घेराव घातला. घटनास्थळी पोहोचलेल्या डीएसपींनी कुटुंबीयांना लेखी तक्रार केल्यास चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यानंतर लोक शांत झाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"