नवी दिल्ली: देशभरात कांद्याचे दर वाढल्याने विरोधकांनी लोकसभेत मोदी सरकारवर निशाणा साधला होता. तसेच सर्वसामान्य नागरिकांचे कांद्याच्या वाढत्या दरामुळे आर्थिक गणित देखील कोलमडलं आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत महत्वाची बैठक बोलवण्यात आली असून सरकारकडून यावर कोणत ठोस पाऊल उचलणार याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे. मात्र कांद्याच्या बाबतीत केंद्रीय मंत्र्यांकडून वेगवेगळे वक्तव्य केले जात असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कांदे दरवाढच्या प्रश्नावर मी फार लसूण, कांदा खात नाही. आमच्या कुटुंबातही कांदा, लसूण फारसा खाल्ला जात नाही असं विधान केलं होतं. यानंतर निर्मला सीतारामन यांच्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी टीका केली होती. त्यातच आता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी मी आयुष्यात कधीही कांद्याची चव चाखलेली नसल्याने कांद्याचा भाव काय आहे हे मला कसं कळणार असं अजब विधान केल्यामुळे निर्मला सीतारामन यांच्यानंतर आता अश्विनी चौबे यांना ट्रोल करण्यात येत आहे.
देशातील कांद्याची एकूण मागणी आणि देशांतर्गत कांद्याचा साठा यात पडलेला खड्डा या आयातीमुळे भरून निघालेला नाही. त्यामुळेच सध्या कांद्याने कुठे प्रति किलो दीडशेचा टप्पा गाठला आहे तर बऱ्याच ठिकाणी शंभरी पार केली आहे. म्हणजे सप्टेंबरमध्ये निर्यात शुल्कवाढ जशी उपयुक्त ठरली नाही तशीच आता केलेली आयातही तूर्त तरी निष्प्रभ ठरली आहे. किरकोळ बाजारात १००-१२० रुपये किलो दरानं नागरिकांना विकत घ्यावा लागतोय. तसेच कांद्याचा सध्याचा दर हा गेल्या 70 वर्षांतील उच्चांक म्हटला जात आहे.