नवी दिल्ली - संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. यामुळे देशात कोरोना बाधितांचा आकडा आता 171 वर गेला आहे. यासंदर्भात, सर्वांनी 15 मिनिटे उन्ह घ्यायला हवे. यामुळे आपल्या शरिराला व्हिटॅमीन 'डी' मिळते. तसेच यामुळे कोणताही व्हायरस नष्ट होतो, असे देशाचे केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कंल्यान राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी म्हटले आहे.
संसदभवनातील कँटीन कॅशलेस करण्याची तयारी -
कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे संसद भवन परिसरातील कँटीन कॅशलेस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आता 31 मार्चपासून कॅश शिवाय कुणालाही काहीही विकत घेता येणार नाही. संसद भवनाचे कँटीन कॅशलेस करण्याच्या दृष्टीने एसबीआयचे प्रीपेड कार्डदेखील तयार करण्यात येत आहेत. या कार्डच्या माध्यमानेच कॅटीनमधून नाश्ता, लंच आदी घेता येणार आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसपासून संरक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता 31 मार्चपासून एसबीआयच्या कार्डनेच व्यवहार होतील.
राज्यात आतापर्यंत 49 जणांना कोरोनाची लागण -
राज्यात आतापर्यंत 49 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मात्र यातील 40 जण हे परदेशातून राज्यात आलेले आहेत. या लोकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या केवळ 9 इतकी आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी यांनी दिली आहे. लोकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
जगभरातील मृतांचा आकडा 8,900 वर -
जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या गुरुवारी (19 मार्च) 2,20,827 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे 170 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृतांची संख्या 8,900 वर पोहोचली आहे. दुसरीकडे 85,121 लोक बरेही झाले आहेत. आशियाई देशांपेक्षा युरोपमध्ये मृत्यूंची संख्या जास्त आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे भारतात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 171 पर्यंत पोहोचली आहे.