बक्सर - लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक नेतेमंडळींना आचारसंहितेच्या चौकटीत राहून प्रचार करावा लागत आहे. दरम्यान, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवरून केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावर उलटसुटल प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाकडून सलग दुसऱ्यांना निवडणुकीचे तिकीट मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबै बक्सर या आपल्या मतदारसंघात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत वाहनांचा मोठा ताफा होता. त्यावेळी बक्सरचे एसडीएम के.के. उपाध्याय यांनी ताफ्यात वाहनांची संख्या अधिक असल्याने मंत्रिमहोदयांकडे विचारणा केली. त्यामुळे अश्विनीकुमार चौबै संतापले. अश्विनीकुमार चौबे आणि एसडीएम यांच्यात झालेल्या विवादाचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यात एसडीएम चौबे यांचे वाहन अडवून त्यांना नियमभंग झाल्याचे सांगताना दिसत आहेत. मात्र त्यामुळे अश्विनीकुमार चौबे संतापल्याचे दिसत आहे. तसेच अशा प्रकारचा आदेश कुणी दिला आहे, अशी विचारणा ते करताना दिसतात.दरम्यान, एसडीएम के.के. उपाध्याय हे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दिसत आहे. मात्र भकलेले मंत्रिमहोदय हे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे. तसेच '' कुणाचा आदेश आहे, कुणाचा आदेश आहे. चला मला तुरुंगात पाठवा, असे संतापून सांगत असल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे.