प्रमोद गवळी, नवी दिल्लीहैदराबाद विद्यापीठातील प्रशासनाच्या जाचामुळे आत्महत्या करणारा रोहित वेमुला हा अनुसूचित जातीचा असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यामुळे केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय आणि विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याविरुद्ध अॅट्रोसिटी अॅक्टखाली गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने रोहित हा ओबीसी असल्याचे सांगितले होते. मात्र, तो माला या जातीचा असून, तिचा अनुसूचित जातींमध्ये समावेश असल्याचा अहवाल संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी चार दिवसांपूर्वी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला सादर केला आहे. त्यामुळे बंडारू दत्तात्रेय, विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव व इतरांविरुद्ध अॅट्रोसिटी अॅक्टची कलमे लावली जातील, असे सांगण्यात येत आहे. आयोगाचे अध्यक्ष पी. एल. पुनिया यांनी सांगितले की, ‘आरोपींविरुद्ध यापूर्वीच एफआयआर दाखल झाला असून, आता या प्रकरणाची अॅट्रोसिटी अॅक्टअन्वये चौकशी केली जाईल. तपास नीट होेतो आहे का, यावर आयोग लक्ष ठेवणार आहे.’ स्मृती इराणी यांच्याविरुद्धही या कायद्यान्वये कारवाई वा चौकशी होईल का, असे विचारता ते म्हणाले की, ‘आम्ही सर्वच बाजू तपासून पाहत आहोत.’
केंद्रीय मंत्र्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2016 7:29 AM