कोलकाता: पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठात कार्यक्रमासाठी गेलेल्या केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियोंना विरोधाचा सामना करावा लागला. विद्यार्थ्यांनी सुप्रियोंना घेराव घालत काळे झेंडे दाखवले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सुप्रियो विद्यापीठात आले होते. यावेळी डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी सुप्रियोंविरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांनी जवळपास दीड तास सुप्रियोंचा प्रवेश रोखून धरत त्यांना धक्काबुक्की केली. बाबुल सुप्रियो यांना धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळताच राज्यपाल जगदीप धनखर यांनी घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थ्यांनी त्यांनाही विरोध दर्शवला. त्यामुळे राज्यपाल बराच वेळ गाडीतच अडकून पडले. यानंतर राज्यपालांनी सुप्रियोंसोबत विद्यापीठ परिसरातून निघण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळीही त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. मी इथं राजकारण करायला आलेलो नाही. मात्र ज्या प्रकारे काही विद्यार्थ्यांनी मला धक्काबुक्की केली, त्यामुळे मी निश्चितच दु:खी आहे, असं सुप्रियो म्हणाले. सुप्रियो यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर बाटल्या फेकल्या आणि त्यांचा चश्मादेखील तोडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. सुप्रियो यांना घेराव घातल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्यपालांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. सुप्रियोंना विद्यार्थ्यांनी अडवून धरलं असताना कुलगुरुंनी पोलिसांना विद्यापीठाच्या परिसरात प्रवेश दिला नाही, असादेखील आरोप होत आहे.