सूरत: शिवसेनेचे मंत्री आणि ठाण्यातील नेते बडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. त्यांच्यासोबत ३५ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये एक अपक्षही आमदार आहेत. शिंदे यांनी आपल्यासोबत यापैकी काही आमदारांना नेले आहेच, तसेच ठाण्यातील खास पदाधिकारीदेखील सूरतला गेले असल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपचे राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे एकनाथ शिंदे यांना भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. तत्पूर्वी भाजपचे केंद्रीय मंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) सूरतमध्ये दाखल झाले होते. यावेळी काही आमदार सूरतमध्ये असल्याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली.
भागवत कराड म्हणाले की, गुजरातचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री उपस्थित होते. राज्यस्तरीय बँक समितीची बैठक घेतली. गुजरातील परिस्थितीचा आढावा घेतला. नाबार्डचे गुजरातमधील कामकाज आणि कार्याचा आढावा घेतला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्याशी भेट घेतली, असे भागवत कराड यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांनी त्यांना शिवसेनेचे आमदार सूरतमध्ये आल्यासंदर्भात प्रश्न विचारला, त्यावर भागवत कराड यांनी प्रतिक्रिया दिली.
मी काही बोलू शकत नाही
मला सकाळीच कळले की, काही आमदार सूरतमध्ये आले आहेत. मात्र, त्यांच्याशी भेट झाली नाही आणि कोणतीही चर्चा झाली नाही, असे भागवत कराड यांनी सांगितले. तसेच उद्धव ठाकरे सरकार कोसळेल का, असा प्रश्नही भागवत कराड यांना विचारण्यात आला. यावर, यासंदर्भात मी काही बोलू शकत नाही. मात्र, राज्यसभा आणि त्यानंतर विधान परिषद निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपला मतदान झाले. त्यावरून महाविकास आघाडी सरकार आमदार नाराज आहेत, हे स्पष्ट झाले आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेत भाजपने अतिरिक्त उमेदवार देऊनही विजय मिळवला. याचाच अर्थ आमदार नाराज असून, भाजपला मदत करायला तयार आहेत, असे भागवत कराड यांना सांगितले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसैनिकांनी मुंबईत जमायला सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. गद्दारांना माफी नाही. मुंबईत एकनाथ शिंदे यांनी पाय ठेवून दाखवावा. त्यांची जागा त्यांना दाखवून देऊ, अशी प्रतिक्रिया संतप्त शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.