नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास गट) प्रमुख चिराग पासवान यांच्या सुरक्षेत बदल करण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने चिराग पासवान यांना सीआरपीएफची झेड श्रेणीची सुरक्षा दिली आहे. यापूर्वी चिरागच्या सुरक्षेसाठी एसएसबी कमांडो तैनात करण्यात आले होते. दरम्यान, आयबीच्या धमकी अहवालानंतर हा बदल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिराग पासवान यांच्या सुरक्षेसाठी झेड श्रेणी अंतर्गत एकूण ३३ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत. यासोबतच त्यांच्या घरी १० सशस्त्र स्टॅटिक गार्ड राहणार आहेत. याशिवाय,चोवीस तास ६ पीएसओ, तीन शिफ्टमध्ये १२ सशस्त्र एस्कॉर्ट कमांडो, देखरेखीच्या शिफ्टमध्ये २ कमांडो आणि ३ प्रशिक्षित ड्रायव्हर चोवीस तास उपस्थित राहणार आहेत.
चिराग पासवान फ्रान्स दौऱ्यावरचिराग पासवान हे बिहारमधील जमुईचे खासदार आहेत. चिराग पासवान सध्या ४५ व्या जागतिक वाईन परिषदेत सहभागी होण्यासाठी फ्रान्समधील डिजॉनमध्ये गेले आहेत. चिराग पासवान यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात प्रवेश केला. तसेच, वडिलांच्या निधनानंतर त्यांनी पक्षाची धुरा सांभाळली. चिराग पासवान यांनी लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत भाजपसोबत युती केली आणि जागावाटपानंतर खात्यात आलेल्या पाचही जागा जिंकल्या. तसेच, २०१९ मध्येही चिराग पासवान यांनी आपली जागा कायम राखली होती आणि विजय मिळवला होता.