पाटणा: भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह त्यांच्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. वादग्रस्त विधानं करणारे गिरीराज सिंह त्यांच्या नव्या वक्तव्यानं पुन्हा चर्चेत आले आहेत. पंतप्रधान देवाचे अवतार असल्याचं सिंह म्हणाले आहेत. बेगुसरायमधल्या साहेबपूर कमाल विधानसभा मतदारसंघातल्या फूल चौकमध्ये एका जनसभेला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं. नव्या भारताचा उदय झाला असून यापुढे भारतामातेकडे आणि भारतीयांकडे डोळे रोखून पाहणाऱ्यांचे डोळे काढून घेतले जातील, असंदेखील त्यांनी म्हटलं. पंतप्रधान देवाचे अवतार असल्याचं गिरीराज सिंह म्हणाले. मात्र त्यांनी नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख टाळला. 'कोणी वाईट वाटून घेऊ नका. देवाचा उदय झालेला आहे. तुम्ही त्यांना ३०३ जागा देऊन विजयी केलं आहे. तेच तुमच्यासाठी देव आहेत. ते देशाचे पंतप्रधान असेपर्यंत जगातील कोणतीही शक्ती भारतमातेचा अपमान करू शकत नाही,' असं सिंह यांनी म्हटलं. भारतीयांना, भारतमातेकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचे डोळे काढून घेऊ. कारण नव्या भारताचा उदय झाला आहे, असं गिरीराज सिंग म्हणाले. त्यांनी भारतीयांना झोपलेल्या वाघाची उपमा दिली. झोपलेल्या वाघाला उठवणं महागात पडेल, असंही त्यांनी म्हटलं. बेगुसरायमधल्या फूल चौक परिसरात १२ जानेवारीपासून सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात आंदोलन सुरू आहे.
भाजपा नेते गिरीराज सिंह म्हणतात, पंतप्रधान म्हणजे देवाचे अवतार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 11:22 AM