बेगुसराय - नेहमी वादग्रस्त विधानांनी चर्चेत असणारे केंद्रीय मंत्री आणि बिहारच्या बेगुसरायचे भाजपा खासदार गिरिराज सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. मिशनरी शाळांमध्ये शिक्षण घेऊन विदेशात जाणारे अनेक भारतीय गोमांस खातात. त्यामुळे मुलांवर संस्कार करण्यासाठी खासगी शाळांमध्ये भगवतगीता पठन शिकविलं पाहिजे असं त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना गिरिराज सिंह यांनी सांगितले की, खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भगवतगीता श्लोक शिकवले पाहिजे. त्याचसोबत शाळेत मंदिर असायला हवं. मिशनरी शाळेत शिकून विद्यार्थी अनेक मोठ्या पदांवर जातात. हीच मुले परदेशात गेल्यानंतर गोमांस खातात. त्यांना हिंदू संस्कार दिले जात नाहीत. त्यामुळे या मुलांवर लहानपणापासून संस्कार होणं गरजेचे आहे. त्यामुळे भगवत गीता श्लोक आणि हनुमान चालिसा यांना शिकविण्यात यावं असं त्यांनी सांगितले.
भागवत कथा या कार्यक्रमाच्या उद्धाटन सोहळ्यात ते बोलत होते. सरकारी शाळांमध्ये जर गीता श्लोक आणि हनुमान चालिसा शिकविण्यास सुरुवात केली तर अनेकांकडून सरकारवर टीका होईल. सरकार हिंदू अजेंडा पुढे नेत आहे असा आरोप करण्यात येईल त्यामुळे याची सुरुवात खासगी शाळांमधून करण्यात यावी असं गिरिराज सिंह यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह नेहमी वादग्रस्त विधान करण्यासाठी ओळखले जातात. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात वाढत्या लोकसंख्येवर भाष्य करताना जर लोकसंख्या नियंत्रण कायदा आणला नाही तर देशात सामाजिक समतोल बिघडेल. तसेच देशातील ५४ जिल्ह्यांमध्ये हिंदूंची संख्या कमी होत आहे असं त्यांनी सांगितले होते. यावेळी गिरिराज सिंह यांनी सांगितले होते की, १९४७ मध्ये ३३ कोटी लोकसंख्या होती. आज १२५ कोटी देशाची अधिकृत लोकसंख्या आहे. मात्र हा आकडा १३६ कोटींच्या वर गेला आहे. देशातील ५४ जिल्ह्यात हिंदूंच्या संख्येत घट होत आहे असं विधान त्यांनी केलं होतं. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या विधानावरुन अनेकदा विरोधी पक्षांकडून भाजपाला टार्गेट करण्यात आलं आहे.