Giriraj Singh On PM Modi Security Breach : पंजाबच्या फिरोजपुरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या ढिसाळपणाबद्दल केंद्र सरकार 'अॅक्शन मोड'मध्ये आलं आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही हयगय अजिबात सहन केली जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकीबाबत सविस्तर अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयानं (Home Ministry) पंजाब सरकारकडे (Punjab Government) मागितला होता. याप्रकरणी आता पंजाबच्या मुख्य सचिवांनी केंद्रीय गृह सचिवांना लिखित रिपोर्ट सोपवला आहे. यामध्ये याप्रकणी स्थापन केलेली समिती तीन दिवसांत अहवाल सोपवणार असल्याचं म्हटलंय. याशिवाय केंद्रीय गृह मंत्रायलानंदेखी पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटीप्रकरणी एक समिती स्थापन केली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी पहिला एफआयआर दाखल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान झालेल्या त्रुटीवरून केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह (Giriraj Singh) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्याही देखील होऊ शकली असती, अशी शक्यता केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी व्यक्त केली. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं होतं. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मरणाच्या विहिरीत अडकवणं हा काही योगायोग नव्हता. याची उच्चस्तरीय चौकशी झाली तर हे षडयंत्र पंजाबचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री कार्यालयापर्यंतच नाही, तर त्याच्या वर पर्यंत त्याचे धागेदोरे सापडतील. त्यांची हत्या ड्रोन किंवा टेलिस्कोपिक गननं झाली असती," अशी शक्यताही गिरिराज सिंह यांनी व्यक्त केली. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.
"जी घटना त्यांच्यासोबत घडली तो योगायोग नव्हता. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता किती आहे हे संपूर्ण जगाला माहित आहे. ही घटना देशाच्या पंतप्रधानांसोबत नाही, तर संपूर्ण देशासोबत घडली आहे. ज्यांनी स्वत: षडयंत्र रचलं ते काय तपास करणार?." असा सवालही त्यांनी केला.
सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली. यासोबतच या प्रकरणाशी संबंधित कार्यवाही सोमवारपर्यंत थांबवण्याचे आदेश न्यायालयाने केंद्र आणि राज्याला दिले आहेत. तसेच, तोपर्यंत केंद्र आणि राज्यांना त्यांच्या तपासाच्या आधारे कोणत्याही अधिकाऱ्यावर कारवाई करता येणार नाही.