भारताची ऑलिंम्पियन नेमबाज मनू भाकर हिला कथितरित्या एअर इंडियाच्याविमानात प्रवेशापासून रोखण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नेमबाजीच्या प्रशिक्षणासाठी आपल्यासोबत आवश्यक ती वस्तू तिच्याजवळ असल्यानं तिला प्रवेश नाकारण्यात आल्याचं सांगण्यात आलं. नेमबाजीसाठी आवश्यक असलेलं शस्त्र नेण्यासाठी तिच्याकडे परवानगी असतानाही तिच्याकडून १० हजार रूपयांची मागणी करण्यात आली. तसंच ही रक्कम न दिल्यामुळे तिला विमानात प्रवेश नाकारण्यात आला. केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्तक्षेपानंतर मनू भाकर हिला विमानात जाण्याची परवानगी देण्यात आली. मनू भाकर हिनं शुक्रवारी संध्याकाळी ट्विटरवर दिल्ली विमानतळावरील एक फोटो शेअर केला. "मला IGI विमानतळावर AI 437 या विमानात प्रवेश करण्याची परवानगी दिली जात नाहीये आणि १०,२०० रूपयांची मागणीही केली जात आहे. माझ्याकडे सर्व आवश्यक ती कागदपत्रे आहेत आणि DGP परमिटही आहे. एअर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी मनोज गुप्ता आणि अन्य कर्मचारी माझा अपमान करत आहेत. कारण माझ्याकडे बंदूक आणि काडतुसे आहेत. किरेन रिजीजू, हरदीप सिंग पुरी सर मी तुमची प्रतीक्षा करत आहे," असं मनू भाकर हिनं आपल्या फोटोसह लिहिलं.