नवी दिल्ली: संसदेचे अधिवेशन नवी दिल्लीत सुरू आहे. अनेक लोकप्रतिनिधी आपापले मुद्दे मांडताना आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) लोकसभेत बोलत होत्या. मात्र, बोलताना सुप्रिया सुळे यांची जीभ घसरली. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या कारभाराचे कौतुक करताना बोलण्याच्या नादात सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आपल्यात नाही, असे अनावधानाने म्हटले. मात्र, लगेचच शेजारील सदस्यांनी सुप्रिया सुळे यांना चूक लक्षात आणून दिली. सुप्रिया सुळे यांनी तत्काळ चूक सुधारत माफी मागितली. या सर्व प्रकारावर खुद्द किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी एक ट्विट केले असून, ते व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार झाले असे की, सुप्रिया सुळे किरेन रिजिजूंचे कौतुक करीत होत्या. पण ही स्तुती करताना सुप्रिया सुळे यांनी चूक केली आणि रिजिजू आता मंत्रालयात नाहीत, असे म्हणण्याऐवजी केंद्रीय मंत्री राहिले नाहीत, असे म्हटले. त्यानंतरही त्यांचे बोलणे सुरू होते. त्यांना आपली चूक लक्षात आली नाही. सभागृहात उपस्थित इतर सदस्यांनी याकडे सुप्रिया सुळेंचे लक्ष वेधले असता त्यांनाही धक्का बसला. या विधानाची सर्वप्रथम काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी दखल घेतली. रिजिजू आता क्रीडामंत्री राहिलेले नाहीत, असे सांगत काँग्रेस नेत्याने सुळे यांचे विधान दुरुस्त केलं. यानंतर सुळे यांना आपली चूक लक्षात येताच त्यांनी ती सुधारून माफी मागितली.
सुप्रिया सुळेजी, मी अजून जिवंत आहे
ही बाब समजली तेव्हा किरेन रिजिजू यांनी एक ट्विट करत मजेशीर प्रतिक्रिया दिली. सुप्रियाजी मी अजूनही जिवंत आहे आणि आपले कर्तव्य बजावत आहे, असे सांगत कामाचे कौतुक केल्याबाबत सुप्रिया सुळे यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, अरुणाचल प्रदेशमधून तीन वेळा खासदार असलेले रिजिजू हे यापूर्वी क्रीडा राज्यमंत्री होते, परंतु २०२१ च्या मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांना कायदा मंत्री करण्यात आले. सध्या ते कायदा मंत्री म्हणून काम पाहात आहेत.