नवी दिल्ली: भारतातील अनेक राज्यात थंडीने कहर केला आहे. उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. दरम्यान, अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमध्ये केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांची गाडी अडकल्याची घटना घडली. यावेळी स्वतः किरेन रिजिजू यांनी कारमधून खाली उतरुन गाडला धक्का मारला. कायदामंत्र्यांनी गाडीला धक्का मारतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
कायदेमंत्री किरेन रिजिजू यांनी गाडीला धक्का मारतानाचा व्हिडिओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आणि अरुणाचल प्रदेशात येणाऱ्या पर्यटकांना बैसाखी, सेला पास आणि नुरानंगमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असल्याची माहिती दिली. या भागात जाण्यापूर्वी पर्यटकांनी संपूर्ण माहिती घ्यावी. बर्फवृष्टीमुळे रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून तापमान उणे 25 अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे, असे रिजिजू म्हणाले.
दुसर्या ट्विटमध्ये किरेन रिजिजू यांनी बर्फवृष्टीची आणखी काही छायाचित्रे शेअर केली आणि लिहिले की सेला पासमधील स्थानिक लोकांनी शेअर केलेली छायाचित्रे आहेत. जेव्हा लोक अडकतात तेव्हा भारतीय लष्कर, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि स्थानिक लोक खूप मदत करतात. पण काळजी घेणे केव्हाही चांगले. मी प्रचंड हिमवर्षाव परिस्थितीत असहायता अनुभवली आहे.
सिक्कीममध्ये बर्फवृष्टीसध्या सिक्कीममध्येही जोरदार बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे येथील चांगू तलावाजवळ अनेक पर्यटक अडकले आहेत. मात्र, लष्कराने बचावकार्य सुरू केले आहे. माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, लष्कराने पर्यटकांना रात्री त्यांच्या कॅम्पमध्ये राहण्यासाठी जागा दिली आहे.
जम्मू-काश्मीरमधील अनेक मार्ग बंदजम्मू-काश्मीरमधील अनेक भागात मुसळधार बर्फवृष्टी होत असून पूंछ जिल्ह्यातील मुघल रस्ता बंद करण्यात आला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. हे रस्ते पूर्णपणे बर्फाने झाकले गेले असून या भागात सतत बर्फवृष्टी होत आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरच्या माता वैष्णोदेवी मंदिरात काल पाऊस पडला. यादरम्यान दर्शनासाठी आलेल्या नागरिकांना काहीसा त्रास सहन करावा लागला.