नवी दिल्ली: मीटू चळवळीतून पुढे आलेल्या घटनांच्या तपासणीसाठी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीत कायदेतज्ज्ञांचा समावेश असेल. #MeToo च्या माध्यमातून लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक महिलेवर माझा विश्वास आहे, असं महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी म्हणाल्या. या सर्व महिलांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी लवकरच एक समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मीटू चळवळीनं जोर धरला आहे. या माध्यमातून अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारांना वाचा फोडली आहे. यामध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आणि पत्रकारांचा समावेश आहे. या तक्रारींची प्रथमच सरकारनं दखल घेतली आहे. या सर्व प्रकरणांच्या चौकशीसाठी सरकार चार सदस्यांची नेमणूक करणार आहे. यामध्ये चार निवृत्त न्यायमूर्तींचा समावेश असेल. या समितीकडून मीटू चळवळीच्या माध्यमातून पुढे आलेल्या तक्रारींवर सुनावणी होईल.
#MeToo: लवकरच कायदेतज्ज्ञांच्या समितीची स्थापना; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 4:06 PM