नवी दिल्ली - तबलिगी जमातच्या निजामुद्दीन मरकज प्रकरणात अनेक जण कोरोना बाधित आढळल्यानंतर, आता केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. तबलिगी जमातने केलेला हा गुन्हा 'तालिबानी गुन्हा' असून त्याला क्षमा केली जाऊ शकत नाही, असे नक्वी यांनी म्हटले आहे.
तबलिगी जमातवर आरोप केला जात आहे, की त्यांच्या निष्काळजीपणामुळे शेकडो लोकांमध्ये कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका वाढला आहे. नक्वी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की 'तबलिगी जमातचा 'तालिबानी गुन्हा'. हा निष्काळजीपणा नाही, 'गंभीर गुन्हेगारी कृत्य' आहे. संपूर्ण देश एक होऊन कोरोनाचा सामना करत असताना, असा 'गम्भीर गुन्हा' माफ केला जाऊ शकत नाही.
यावर्षी 2100 परदेशी लोकांनी दिली निजामुद्दीन मुख्यालयाला भेट - गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जानेवारीपासून ते आतापर्यंत जवळपास 2100 परदेशी लोकांनी तबलिगी कामाच्यासंदर्भात भारताचा दौरा केला आहे. या सर्वांनी दिल्लीच्या निजामुद्दीन येथील जमातच्या मुख्यालयाला भेट दिली आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी नक्विंनी दिलाय 1 कोटी रुपयांचा निधी -मुख्तार अब्बास नक्वी यांनी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी आपल्या खासदार निधीतून 1 कोटी रुपये दिले आहेत. भाजपाने आपल्या सर्व खासदारांना आवाहन केले आहे, की त्यांनी आपल्या 5 कोटी रुपयांच्या खासदार निधीतून प्रत्येकी 1 कोटी रुपये कोरोना व्हायरसविरोधातील लढाईसाठी सहकार्य म्हणून द्यावा.