मुंबई : भोंग्यांवरून प्रत्येकजण आपापली कुस्तीबाजी करीत आहे. प्रार्थना ही शांततेसाठी असते कुणाला घाबरविण्यासाठी नाही, अशा शब्दांत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मशिदीवरील भोंग्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केले. मात्र, ध्वनिप्रदूषणाच्या संदर्भात देशभर कायदे आणि नियम आहेत. त्यांचे पालन व्हायला हवे. हे नियम तोडायची परवानगी कुणालाही नाही, असेही नक्वी म्हणाले.
मुंबई दौऱ्यावर असलेल्या नक्वी यांनी रविवारी माध्यमांशी बातचित केली. देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी धार्मिक हिंसाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे. या संदर्भात विचारले असता नक्वी म्हणाले की, ज्या लोकांना इतिहासच धार्मिक हिंसाचाराचा आणि रक्तपाताचा आहे, अशा मंडळींनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठविले आहे. याच विरोधकांच्या सत्ताकाळात महाराष्ट्रात भिवंडीची घटना घडली. मेरठ, बिहारमध्ये भागलपूरला, दिल्लीत शिखांचे नरसंहार याच विरोधकांच्या सत्ताकाळात झाले. पत्र लिहिणारे विरोधक हे धार्मिक हिंसाचाराचे पारंपरिक व प्रोफेशनल हिस्ट्रीशीटर असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.