लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये संपत्ती विभागाती चालकाचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. हृदय विकाराचा तीव्र झटका आल्यानं चालकाचा प्राण गेला. यानंतर चालकाच्या कुटुंबीयांनी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. चालक प्रकृतीच्या कारणामुळे सुट्टीवर असतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणेंसोबत त्यांची ड्युटी लावण्यात आली, असा कुटुंबीयांचा आरोप आहे. त्यांनी अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली असून आता पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
अशोक कुमार वर्मा राज्य संपत्ती विभागात चालक पदावर कार्यरत होते. केंद्रीय कॅबिनेट मंत्री लखनऊमध्ये असताना अशोक कुमार यांना ड्युटी लावण्यात आली. ड्युटीवर असताना अशोक यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर अधिकाऱ्याच्या गाडीनं त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला.
अशोक कुमार यांची प्रकृती ठीक नसल्यानं ते वैद्यकीय सुट्टीवर होते. मात्र राणे आल्यानं त्यांना जबरदस्तीनं ड्युटीवर बोलावण्यात आलं, असा अशोक यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. संपत्ती विभागात मोटर इंचार्ज असलेल्या अमरिश श्रीवास्तव यांच्यावर अशोक यांच्या कुटुंबीयांनी थेट आरोप केले आहेत. 'अमरिश यांना अशोक यांच्या आजारपणाची कल्पना होती. मात्र तरीही त्यांनी जबरदस्तीनं अशोक यांना फोन करून बोलावलं. ड्युटीवर न आल्यास निलंबित करण्याची धमकी दिली. त्यामुळे अशोक यांना ड्युटीवर जावं लागलं,' असा आरोप अशोक यांच्या कुटुंबीयांनी केला.
अशोक कुमार यांचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्यानं झाल्याचं हजरतगंजचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राघवेंद्र मिश्र यांनी सांगितलं. मात्र अशोक यांच्या कुटुंबीयांनी हत्येचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली आहे. प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. अशोक कुमार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवालातील माहितीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मिश्र यांनी दिली.