Nitin Gadkari : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीपेक्षा फारसे चांगले यश मिळवता आलं नाही. ४०० पारची घोषणा देणाऱ्या एनडीएला मोठी कसरत करावी लागली. भाजपसह अनेक पक्षांनी या निकालाची कारणे सांगितली. विरोधकांचा प्रचार, फेक नरेटिव्ह, संविधानात बदल अशा गोष्टीमुळे भाजपला मोठा फटका बसल्याचे म्हटलं गेलं. आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण केलं आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्याचं कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी मतदारांना गोंधळात टाकल्याचा आरोप मंत्री नितीन गडकरी यांनी केला. जूनमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर बहुमत मिळवू शकला नाही आणि केवळ २४० जागा जिंकू शकला. तर २०१९ मध्ये भाजप पक्षाला ३०३ जागा मिळाल्या होत्या. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान नितीन गडकरी यांनी या निकालाबाबत भाष्य केलं.
विरोधकांनी भीती निर्माण केली - नितीन गडकरी
"ही निवडणूक एकतर मतं लोकांना पटवणारी किंवा गोंधळात टाकणारी होती. सुरुवातीला विरोधकांनी मतदारांचा भ्रमनिरास करण्यासाठी कुजबुज सुरू केली होती. भाजप डॉ.भीमराव आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात असून संविधान बदलणार असल्याचे विरोधकांनी सांगितले. त्यांच्या नेत्यांनी, विशेषत: मागासवर्गीयांमध्ये भीती निर्माण केली की, त्यांना मिळत असलेले फायदे यापुढे राहणार नाहीत. दुसरे म्हणजे, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आम्ही केलेल्या उपाययोजना त्यांच्या विरोधात असल्याचे सांगण्यात आले," असं नितीन गडकरी म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या सरकारची १० वर्षे देशासाठी सुवर्ण वर्षे
"लोकसभा निवडणूक हा भारताचा विजय होता असे मला वाटते. भाजप सरकारमध्ये परतला आणि मला १०० टक्के विश्वास आहे की आगामी चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये आम्हाला चांगले बहुमत मिळेल. भाजप सक्षम आहे, त्याचा रेकॉर्ड चांगला आहे आणि तो या देशाचे भविष्य बदलू शकतो, असा विश्वास जनतेने पुन्हा दाखवला आहे. तुम्ही काँग्रेसच्या ६० वर्षांच्या आणि भाजपच्या १५ वर्षांच्या कामगिरीची तुलना करू शकता. तुम्हाला उत्तर मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची १० वर्षे देशाच्या इतिहासातील विकास, अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक या सर्व बाबतीत सुवर्ण वर्षे आहेत. आमच्या सरकारने पाणी, वीज, वाहतूक आणि दळणवळण अशा पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले. त्याशिवाय आपल्याकडे उद्योग, व्यापार, व्यवसाय आणि रोजगार होऊ शकत नाहीत किंवा गरिबी हटवता येणार नाही," असंही नितीन गडकरी म्हणाले.
विरोधकांकडून पंतप्रधानपदाची ऑफर
दरम्यान, निवडणुकीपूर्वी मला विरोधकांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असं विधान नितीन गडकरी यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या होत्या. “मला चांगलं लक्षात आहे, मी कुणाचंही नाव घेणार नाही. मात्र त्या व्यक्तीने मला सांगितलं होतं, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही पाठिंबा देऊ. मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पाठिंबा का द्याल? तसंच मी तुमचा पाठिंबा का घेऊ? पंतप्रधान होणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय नाही. मी माझी मूल्यं, विचार आणि माझी संघटना यांच्याशी प्रामाणिक आहे. मी कुठल्याही पदासाठी तडजोड करत नाही. मला माझ्या मूल्यांवर विश्वास आहे. भारतीय लोकशाहीचा आधार असलेली ही मूल्यं आहेत.” असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.