Joshimath Sinking: उत्तराखंडातील जोशीमठ येथे भयावह परिस्थिती आहे. ठिकठिकाणी जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. शेकडो घरांना तडे गेले आहेत. अनेकांना स्थलांतरित करण्यात येत आहे. जोशीमठमधील परिस्थितीची राज्य आणि केंद्र सरकारने दखल घेतली असून, उच्च स्तरीय बैठकांचे सत्र सुरू आहे. जोशीमठ येथील परिस्थितीला तेथील काही मोठे प्रकल्प कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी चारधाम यात्रेच्या मार्गामुळे जोशीमठ येथे भूस्खलन होत नाही, असे स्पष्ट केले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, जोशीमठमध्ये दरड कोसळण्याच्या घटनांच्या कारणांचा तज्ज्ञ अभ्यास करत आहेत. जोशीमठ पर्वतामुळे समस्याग्रस्त आहे. चारधाम मार्गामुळे ही परिस्थिती उद्भवलेली नाही, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून 'ग्रीन फ्युल'साठी काम करत आहेत, मग ते हायड्रोजन असो, इथेनॉल असो किंवा इलेक्ट्रिक वाहने असोत. भारत लवकरच ऊर्जा निर्यात करणारा देश बनेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी ग्रीन फ्युलबाबत बोलताना व्यक्त केला.
येत्या पाच वर्षांत भारत सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश बनेल
भारत हा साखर, मका, तांदूळ आणि गहू यांचे अतिरिक्त उत्पादन असलेला देश आहे. ऊर्जा आणि वीज क्षेत्रात विविधता आली आहे. येत्या पाच वर्षांत भारत इथेनॉलचा सर्वात मोठा उत्पादक देश बनेल. ग्रीन हायड्रोजन हे भविष्य आहे. इथेनॉल आणि पेट्रोलचे मायलेज समान आहे. आता अधिकाधिक वाहन उत्पादक फ्लेक्स इंजिन वापरत आहेत, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. तसेच नितीन गडकरी यांनी नवीन महामार्गांची माहिती दिली. नवीन महामार्गामुळे ट्रकचालकांचा प्रवासाचा वेळ कमी होईल. यामुळे लॉजिस्टिक खर्चांत बचत होऊन निर्यातीत सुधारणा होईल, असे नितीन गडकरी म्हणाले.
दरम्यान, याच कार्यक्रमात बोलताना, वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी मोदी सरकारच्या योजनांची माहिती दिली. मोदी सरकारचे ध्येय अर्थव्यवस्थेत आर्थिक समावेशन करणे आणि औपचारिक करणे आहे. जेव्हा अर्थ राज्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ गोष्टी सांगितल्या. तुम्हाला आर्थिक समावेशन, आर्थिक साक्षरता आणि डिजिटल व्यवहारांवर काम करावे लागेल, असे भागवत कराड यांनी नमूद केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"