Pashupati Paras Resigns: नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) जागावाटपामुळे नाराज झालेल्या लोक जनशक्ती पार्टीचे (एलजेपी) अध्यक्ष पशुपती पारस यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनामा दिल्याचे घोषित केले. तसेच, वैयक्तिकरित्या आपल्यावर अन्याय झाल्याचे पशुपती पारस यांनी सांगतिले.
"मी समर्पण आणि निष्ठेने एनडीएची सेवा केली, परंतु वैयक्तिकरित्या माझ्यासोबत अन्याय झाला. आजही मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आभारी आहे", असे पशुपती पारस म्हणाले. तसेच, आरजेडीसोबत चर्चा झाल्याबद्दल विचारले असता पशुपती पारस म्हणाले, "मला जेवढे बोलायचे होते, तेवढे बोललो आहे. आमच्या पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांसोबत बसून आम्ही भविष्यातील राजनीती ठरवू".
दरम्यान, पशुपती पारस यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे. पशुपती पारस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "महोदय, मी तुम्हाला कळवू इच्छितो की काही अपरिहार्य कारणांमुळे मी मंत्रिपरिषदेचा तत्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे. दरम्यान, मंत्रिपरिषदेचा सदस्य म्हणून माझ्यावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद".
सोमवारी एनडीएने बिहारमधील लोकसभेच्या 40 जागांसाठी तिकीट वाटपाची घोषणा केली. या जागावाटपात भाजपा, जेडीयू, एलजेपी (रामविलास), राष्ट्रीय लोक मोर्चा आणि एचएएमचा समावेश आहे. मात्र, पशुपती कुमार पारस यांच्या एलजेपीला एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे एनडीएमध्ये सहभागी असेलला एलजेपी नाराज असल्याचे सांगण्यात येते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीएमध्ये जागा न मिळाल्याने नाराज असलेले पशुपती पारस आरजेडीच्या संपर्कात आहेत. आज ना उद्या ते मोठी घोषणा करतील अशी अपेक्षा आहे. पशुपती पारस यांनी यापूर्वीच हाजीपूरमधून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. आता चिराग यांना ही जागा एनडीएमध्ये मिळाली आहे.