शहिदाच्या पार्थिवासोबत केंद्रीय मंत्र्याचा सेल्फी(?) व्हायरल, अपप्रचाराची तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 02:45 PM2019-02-18T14:45:45+5:302019-02-18T14:47:06+5:30
केंद्रीय मंत्री अल्फोन्स कन्नानथनम यांनी केरळमधील शहीद जवान वसंथ कुमार यांना आदरांजली वाहिल्यानंतर सेल्फी काढल्याचा तथाकथित फोटो व्हायरल झाला होता.
तिरुवनंतपुरम - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 40 जवानांना वीरमरण आल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. सर्वसामान्यांपासून नेतेमंडळीपर्यंत सर्वजण वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहत आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री अल्फोन्स कन्नानथनम यांनी केरळमधीलशहीद जवान वसंथ कुमार यांना आदरांजली वाहिल्यानंतर सेल्फी काढल्याचा तथाकथित फोटो व्हायरल झाला होता. त्यावरून केंद्रीय मंत्र्यांविरोधात संतापाची लाट पसरली. मात्र तो सेल्फी नव्हता तर एका व्यक्तीने माझे छायाचित्र काढले होते, असा दावा मंत्र्यांनी केला असून, आपली बदनामी केल्याप्रकरणी थेट पोलिसांत तक्रार दिली आहे.
पुलवामा येथील हल्ल्यात सीआरपीएफ जवान वसंथ कुमार यांना वीरमरण आले होते. त्यानंतर शनिवारी त्यांचे पार्थिव वायनाड जिल्ह्यातील त्यांच्या घरी आणण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यावेळी वसंथ कुमार यांना आदरांजली वाहण्यासाठी केंद्रीय मंत्री अल्फोन्स कन्नानथनम हे आले होते. त्यानंतर अल्फोन्स यांनी सोशल मीडियावर वसंथ कुमार यांना श्रद्धांजली वाहतानाची काही छायाचित्रे पोस्ट केली होती. मात्र त्याच छायाचित्रांवरून वादास सुरुवात झाली.
अखेर या वादानंतर केंद्रीय मंत्री अल्फोन्स यांनी केरळ पोलीस महासंचालंकांकड तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियावरील माझ्या छायाचित्रांचा चुकीचा अर्थ काढून माझी बदनामी करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच माझा जो फोटो सेल्फी म्हणून प्रसारित केला जात आहे. तो सेल्फी नव्हता तर तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने तो फोटो काढला होता. त्यानंतर माझ्या टीमने तोच फोटो शेअर केला. त्यामुळे अफावांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.