नवी दिल्ली: प्रगती मैदानावर 'आहार इंटरनॅशनल फूड फेयर'ला सुरुवात झाली आहे. मात्र या मेळाव्याच्या उद्घाटनालाच गोंधळ झाला. केंद्रीय मंत्री पियूष गोयल भाषण देत असताना हा प्रकार घडला मेळाव्याचा वीज पुरवठा अचानक खंडित झाला. याचा कार्यक्रमावर कोणताही परिणाम झाला नाही. बुकलेट लॉन्च झाल्यानंतर गोयल भाषण द्यायला गेले. त्याचवेळी हाय हायच्या घोषणा सुरू झाल्या. काही जण थेट व्यासपीठापर्यंत पोहोचले.
मेळाव्यात गोंधळ घालणाऱ्यांना गोयल यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आलं. त्यामुळे गोयल यांना कार्यक्रम सोडून निघावं लागलं. घोषणा देणाऱ्यांनी गोयल यांना घेराव घालत समस्या मांडल्या. खाद्यपदार्थ मेळाव्याला संपूर्ण देशभरातून व्यवसायिक आले आहेत. परदेशातून खरेदीदार आले आहेत. मात्र तरीही मेळाव्यात कोणतीही तयारी नाही, अशा तक्रारी लोकांनी गोयल यांच्याकडे केल्या.
खाद्यपदार्थ मेळाव्यात अनेकांनी स्टॉल मांडले आहेत. मात्र मेळावा भरलेल्या ठिकाणी स्वच्छता, वीज नसल्याचं स्टॉलधारकांनी सांगितलं. गोयल यांनी ढिसाळ नियोजन पाहावं असा आग्रह स्टॉलधारकांनी धरला. गोयल यांनी त्यासाठी तयारी दर्शवली. मात्र वीज नसल्यानं लिफ्टच बंद होती. त्यामुळे गोयल यांना माघारी जावं लागलं. गोयल यांनी स्टॉलधारकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. गोंधळ वाढताच गोयल तिथून निघून गेले.