- संजय शर्मा
नवी दिल्ली : लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक घेण्याची अलीकडे जोरदार चर्चा होती. मात्र, सरकारला कोणतीही घाई नसून राज्यातील विधानसभा निवडणुका ठरलेल्या वेळीच होतील, असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी स्पष्ट केले. येथे एका अनौपचारिक संवादात त्यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाच्या युती सरकारला निवडणुकीची घाई नाही. ज्यांना निवडणुकीची घाई आहे, त्यांनी निवडणुका घ्याव्यात. भाजप निवडणुकीसाठी सज्ज आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका वेळेपूर्वी घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भाजप आणि शिवसेना सरकार प्रयत्नशील आहे. राज्यातील विधानसभेच्या निवडणुका ठरलेल्या वेळेवरच होतील, असे गोयल यांनी स्पष्ट केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग आतापासूनच कामाला लागला असून अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळेही दोन्ही निवडणुका एकत्र होतील की काय, अशी चर्चा सुरू झाली होती.
विरोधकांचे परस्परभिन्न दावेकाही दिवसांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी, केंद्र सरकारही वेळेपूर्वी निवडणुका घेऊ शकते, असे वक्तव्य केले होते. विराेधी पक्षांचे सामर्थ्य कमी करण्यासाठी केंद्र सरकार असे पाउल उचलू शकते, असा दावा त्यांनी केला हाेता. देशात विविध राज्यांचे चित्र बदलत असून सत्ताधारी पक्षाला मतदार जागा दाखवित असल्यामुळे माेदी सरकार लाेकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेतील, असे वाटत नसल्याचे मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला हाेता.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा नाही - उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाजपची चर्चा सुरू असल्याची अटकळ बांधली जात असताना पीयूष गोयल यांनी अशा शक्यता फेटाळून लावत सांगितले की, असे काहीही नाही. - उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाजपची कोणतीही चर्चा होत नाही. २० जूनला संजय राऊत यांच्याकडून गद्दार दिवस नाव दिल्याच्या मुद्द्यावर पीयूष गोयल म्हणाले की, आपल्या अशा विधानांमुळेच संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना कोठून कोठे पोहाेचविले आहे. - गद्दारी कोणी कोणाशी केली हे महाराष्ट्रातील जनता जाणून आहे. निवडणुका लढविल्या भाजपसोबत आणि सरकार बनविले काँग्रेससोबत.