नवी दिल्ली - केंद्रीयमंत्री आणि बालासोरचे खासदार यांनी दिल्लीस्थित घरी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतलं आहे. ओडिशातील भाजपा आमदारासोबत गेल्या आठवड्यात दोनवेळा सारंगी यांनी बैठक घेतली होती. या भाजपा आमदाराचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर सांरगी हे क्वारंटाईन झाले असून त्यांनी स्वत: ट्विटरवरुन याबाबतची माहिती दिली.
बालासोर जिल्ह्यातील निलगिरी मतदारसंघाचे आमदार आणि भाजपा नेते सुकांता कुमार नायक यांच्यासमेवत मतदारसंघात दौरा केला होता. त्यावेळी, 2 आणि 3 जुलै रोजीच्या दोन दिवसातील कार्यक्रमात नायक यांच्याशी जवळून संबंध आला. मला मिळालेल्या माहितीनुसार आमदार सुकांता नायक यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे मी दिल्लीतील घरातच स्वत:ला क्वारंटाईन करुन घेत असल्याचं सारंगी यांनी म्हटलंय.
दरम्यान, पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण झाली आहे. शाहिदने आपल्या चाहत्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केले होतं. त्यावेळी, मोदी सरकारमधील मंत्री प्रताप सारंगी यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी शाहिद आफ्रिदीला पंतप्रधान नरेंद्र मोदींची मदत घ्यावी असा सल्ला दिला होता. पाकिस्तानमधील प्रत्येक एका हॉस्पिटलची मला पूर्ण माहिती आहे. शाहिद आफ्रिदीला जर कोरोनातून वाचायचं असेल तर त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मदत घ्यावी, असे सारंगी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले होते.