नवी दिल्ली : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा खूप चर्चेत होता. यानंतर आता निवडणूक निकाल आणि सरकार स्थापनेनंतर केंद्रीय मंत्री शिवसेना (शिंदे गट) खासदार प्रतापराव जाधव यांनी पीओकेबाबत मोठा दावा केला आहे. एनडीएने लोकसभेत ४०० हून अधिक जागा जिंकल्या असत्या तर पीओके परत घेणे शक्य झाले असते, असे प्रतापराव जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले.
रविवारी (दि.७) एका कार्यक्रमात बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव बोलत होते. लोकसभा निवडणुकीत एनडीएने ४०० हून अधिक जागा जिंकल्या असत्या तर पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारतात सामील करून घेणे आणि १९६२ मध्ये चीनने ताब्यात घेतलेली जमीन परत घेणे शक्य झाले असते, असे खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले. तसेच, पीओके भारताचाअविभाज्य भाग असूनही पाकिस्तानच्या ताब्यात आहे, असेही खासदार प्रतापराव जाधव म्हणाले.
याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पीओकेचा भारताच्या नकाशात समावेश करण्याचे स्वप्न खूप दिवसांपासून पाहत आहेत, असा दावा खासदार प्रतापराव जाधव यांनी केला. ते म्हणाले की, १९६२ च्या युद्धात चीनने ताब्यात घेतलेल्या जमिनीवर पुन्हा दावा करण्याचे भारताचे लक्ष्य आहे. तसेच, ४०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या असत्या तर दोन तृतीयांश बहुमत मिळू शकले असते, असा दावाही खासदार प्रतापराव जाधव यांनी केला.
विरोधकांवर खोटा प्रचार केल्याचा आरोपदरम्यान, विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलले जाईल, असा खोटा प्रचार केल्याचा आरोप खासदार प्रतापराव जाधव यांनी केला. तसेच, संविधान बदलता येणार नाही. १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी राज्यघटनेच्या विध्वंसाचे वास्तविक उदाहरण असल्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले.