पटना : एका बाजूला शेतकरी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला असताना, दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवली जात आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून त्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी त्यांच्या आंदोलनाला बोगस म्हटलं जात आहे. पाटण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा उल्लेख 'पब्लिसिटी स्टंट' म्हणून केला आहे. नवभारत टाईम्सनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.देशातील शेतकरी कालपासून (1 जून) संपावर आहे. शेतकऱ्यांचा संप 10 जूनपर्यंत सुरू होणार आहे. केंद्रातील मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पाटण्यामध्ये एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राधा मोहन सिंग यांनी अतिशय संवेदनशील विधान केलं. 'प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी कामं करावी लागतात. देशात 12-14 कोटी शेतकरी आहेत. प्रत्येक शेतकरी संघटनेत 1000-500 शेतकरी असतील आणि त्यांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीतरी करावं लागतं,' असं धक्कादायक विधान सिंग यांनी केलं. भाजपा नेत्यांनी याआधीही शेतकऱ्यांबद्दल बेताल विधानं केली आहेत. शेतकरी आंदोलन हा काही मुद्दा नाही, असं विधान हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलं होतं. 'शेतकऱ्यांच्या कोणत्याही मागण्या नाहीत. ते उगाच नको त्या गोष्टी करुन स्वत:च नुकसान करत आहेत,' असं खट्टर म्हणाले होते.
शेतकऱ्यांचा संप म्हणजे पब्लिसिटी स्टंट- केंद्रीय कृषिमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2018 4:34 PM