नवी दिल्ली - लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे आज निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून रामविलास पासवान हे आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी ट्विट करून ही माहिती दिली. सध्या केंद्र सरकारमध्ये ते ग्राहक, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी सांभाळत होते.
रामविलास पासवान यांचा जन्म ५ जुलै १९४६ रोजी बिहारमधील खगरियामध्ये झाला होता. पासवान यांनी कोसी कॉलेज आणि पाटणा विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर १९६९ मध्ये त्यांची डीएसपी म्हणून निवड झाली होती. मात्र त्याच वर्षी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि ते आमदार म्हणून निवडून आले होते. तेव्हापासून आतापर्यंत पासवान यांनी बिहार आणि देशाच्या राजकारणात आपली वेगळी ओळख जपली होती.
पासवान यांनी गेल्या ३२ वर्षांत ११ निवडणुका लढवल्या होत्या. त्यापैकी ९ निवडणुकांत ते विजयी झाले होते. सध्याच्या मोदी सरकारमध्ये रामविलास पासवान ग्राहक, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाचा कारभार पाहत होते. दरम्यान, देशातील सहा पंतप्रधानांसोबत त्यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याचा विक्रम पासवान यांच्या नावावर आहे. तसेच पासवान यांनी केंद्रात रेल्वे, माहिती प्रसारण, खनिज, रसायन, अन्न आणि नागरी पुरवठा अशा विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे.