Ramdas Athawale On Donald Trump: रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली असून ते आता अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर जगभरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही त्यांच्या खास शैलीत डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली आहे. डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस पहिल्यांदाच अमेरिकेच्या महिला राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता होती. मात्र, त्या ट्रम्प यांच्या पेक्षा खूप मागे राहिल्या. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प तिसऱ्यांदा व्हाईट हाऊसमध्ये जाणार आहेत. या विजयानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन आहेत आणि माझ्या पक्षाचे नाव देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे. त्यांच्या विजयामुळे मी खूप खूश आहे. यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
"डोनाल्ड ट्रम्प यांना हिंदू असो वा मुस्लिम, अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची मते मिळाली आहेत. आम्ही त्यांच्या निवडीमुळे आनंदी आहोत पण कमला हॅरिसच्या पराभवामुळे दु:खीही आहोत. कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या असून डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार असल्याने त्या निवडून आल्या असत्या तर बरे झाले असते. मात्र अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्याने भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ होणार आहेत," असं रामदास आठवले म्हणाले.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवडून आले आहेत. त्यांना ५० राज्यांतील ५३८ पैकी २७७ जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी २७० जागा आवश्यक आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना कडवी झुंज देऊनही केवळ २२४ जागा जिंकता आल्या. ट्रम्प हे २०१६ मध्ये पहिल्यांदा अध्यक्ष झाले होते. २०२० मध्ये जो बायडेन यांच्याकडून पराभूत झाले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर चार वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनलेले ट्रम्प हे पहिले राजकारणी आहेत.