Ramdas Athawale News: बिहारमध्ये काही दिवसांच्या उलथापालथीनंतर नितीश कुमार यांनी सकाळी राजीनामा दिला आणि सायंकाळी नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी ते भाजपाच्या साथीने राज्याच्या नव्या एनडीए सरकारचे मुख्यमंत्री झाले आहेत. यावरून विरोधक तसेच इंडिया आघाडीतील अनेक नेते नितीश कुमार आणि भाजपावर टीका करत आहे. तर, भाजपा नेते याला प्रत्युत्तर देत आहेत. यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बिहारमधील सत्तांतरावर प्रतिक्रिया देताना, काँग्रेसवर निशाणा साधला.
मीडियाशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ४४ जागा मिळाल्या होत्या. आता आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ३० जागांवर समाधान मानावे लागेल. एनडीए मोठा विजय साजरा करेल, असा मोठा दावा रामदास आठवले यांनी केला.
शेवटी फक्त काँग्रेसच शिल्लक राहील
नितीश कुमार हे इंडिया आघाडीतील सर्वांत मोठे चेहरे होते. नितीश कुमार हे आता एनडीएसोबत आले आहेत. ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे. पंजाब आणि हरियाणा येथे आम आदमी पक्ष लोकसभा निवडणूक एकट्याने लढणार आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये आता काही दम राहिलेला नाही. हळूहळू करून इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष दूर होतील आणि शेवटी फक्त काँग्रेसच शिल्लक राहील, या शब्दांत रामदास आठवले यांनी टीका केली.
दरम्यान, नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपचीच साथ घेत मुख्यमंत्रिपदाची नव्याने शपथ घेतली. गेल्या काही दिवसांपासून अशा घडामोडींबाबत जोरदार चर्चा सुरू होती. इंडिया आघाडीत ते खूश नव्हते. तसेच पक्षात फुटीची भीती, ही दोन मुख्य कारणे नितीश कुमारांच्या पुन्हा भाजपसोबत जाण्यामागे बोलली जात आहेत.